

कोल्हापूर : श्री करवीरनिवासिनी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याअंतर्गत परिसरात भूसंपादन होणार आहे. त्याकरिता बाधित होणाऱ्या 139 मिळकतींचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, या मिळकतींचे मूल्यांकन करण्याचे काम सुरू असून, याबाबतचा अहवाल लवकरच जिल्हा प्रशासनाला सादर केला जाणार आहे.
राज्य शासनाने 6 मे 2025 रोजी 1 हजार 445 कोटी 95 लाख रुपयांच्या श्री करवीरनिवासिनी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. यापैकी 143 कोटींच्या पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात या परिसरात केल्या जाणाऱ्या कामांकरिता भूसंपादन केले जाणार आहे. संपादित केल्या जाणाऱ्या मिळकतींच्या मूल्यांकनासाठी करवीर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
समितीकडून संपादित केल्या जाणाऱ्या संभाव्य मिळकतींसाठी प्राथमिक सर्वेक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. याकरिता महसूल, महापालिका व नगर भूमापनच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या एकूण तीन पथकांकडून आठ दिवसांच्या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले.