

कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात होणार्या परिणाम आणि अडचणींबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 9) विधानभवनात बैठक आयोजित केली आहे. दुपारी तीन वाजता होणार्या या बैठकीला या दोन्ही जिल्ह्यांतील सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांना आमंत्रित केले जाणार आहे. यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील 29 खासदार आणि आमदार या बैठकीला उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. अलमट्टी धरणाची सध्याची उंची 519 मीटर पर्यंत आहे. त्यापैकी 517 मीटरवर साठा गेला, तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होते. त्यात पुन्हा धरणाची उंची 525 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बहुतांश भाग दरवर्षी जलमय होणार आहे. यामुळे या उंचीवाढीला विरोध सुरू आहे. या विरोधासाठी सर्वपक्षीय आंदोलनही झाले. यावेळी बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार जलसंपदामंत्री विखे-पाटील यांनी बैठक घेतली. मात्र, त्याला विरोधी पक्षातील आमदारांना बोलावले नाही. यावरूनही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.