कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
विमानतळ परिसरात नियमबाह्य बांधकामे, अडथळे दूर करण्याची प्रक्रिया सुरू करा, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विमानतळ प्राधिकरणाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळप्रश्नी मंगळवारी त्यांनी तीन बैठका घेतल्या. विमानतळाची धावपट्टी तीन हजार मीटर करण्यासाठी लवकरच फिजिबिलिटी सर्व्हे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
विमानतळ पर्यावरण व्यवस्थापन समितीच्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी येडगे यांनी विमानतळ परिसरातील अडथळे दूर करण्यासाठी प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षेखालील समितीची स्थापना केल्याचे सांगितले. राष्ट्रीय महामार्गावरील झाडांच्या फांद्या काढून घेणे, वैभव सोसायटीतील काही झाडे काढणे, काही इमारतींचे भाग काढणे, काही खांबांची उंची कमी करणे आदी सर्व्हेनुसार जे अडथळे आहेत, ते दूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले.
इमारतीसह विविध बांधकामांच्या उंचीबाबत बंधनकारक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी प्रक्रिया, त्याची माहिती याकरिता बांधकाम क्षेत्रातील संबंधितांसह नागरिकांसाठी कार्यशाळा घ्या. विमानतळाशेजारील सात गावांत कचरा व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनासाठी कार्यशाळा घ्या, अशा सूचनाही येडगे यांनी दिल्या.
विमानतळाची धावपट्टी 3 हजार मीटरपर्यंत करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून फिजीबिलिटी सर्व्हे (व्यवहार्यता तपासणी अभ्यास) सप्टेंबर महिन्यात होईल, याद़ृष्टीने कार्यवाही करा. या सर्व्हेसाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व पातळ्यांवर पाठपुरावा केला जाणार असल्याचेही येडगे यांनी स्पष्ट केले. लक्ष्मीवाडी येथील ग्रामस्थांचे नव्या जागेत पुनर्वसन केले जाणार आहे, त्याची प्रक्रिया पुढील महिन्यापासून सुरू करा. पावसाळा संपल्यानंतर प्रत्यक्ष पुनर्वसन पूर्ण करा, असेही त्यांनी सांगितले.
विमानतळ सुरक्षिततेविषयी झालेल्या बैठकीत सरंक्षक भितींचे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना येडगे यांनी दिल्या. यावेळी सुरक्षिततेबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.