Balumama Yatra | सात टन भंडाऱ्याची उधळण; आदमापूरची बाळूमामा यात्रेची ५ लाख भाविकांच्या साक्षीने सांगता

Admapur Balumama | सद्गुरु बाळूमामा यांची वार्षिक भंडारा यात्रा पाच लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.
Balumama Yatra Admapur
बाळूमामा यांची वार्षिक भंडारा यात्रा पाच लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झालीPudhari
Published on
Updated on

Balumama Admapur Yatra 2026
मुदाळतिट्टा : श्रीक्षेत्र आदमापूर येथील सद्गुरु बाळूमामा यांची वार्षिक भंडारा यात्रा मंगळवारी (दि. १७) पाच लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली. यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात सात टन भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण करण्यात आली. या उधळणीमुळे संपूर्ण आदमापूर गाव पिवळ्या रंगात न्हाऊन निघाले होते.

पारंपरिक वाद्यांचा गजर, हरीभजनांचा नाद आणि “बाळूमामांच्या नावानं चांगभलं”च्या जयघोषात पालखी सोहळा पार पडला. भक्तांनी नवस फेडत भंडाऱ्याची उधळण करत उत्साहात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, बाळूमामांच्या १९ बग्यातील अश्वांनी केलेला नृत्याविष्कार लक्षवेधी ठरला.

Balumama Yatra Admapur
Balumama Yatra | आदमापूर भंडारा यात्रेत लस्सीमुळे 43 भाविकांना विषबाधा

यात्रेदरम्यान मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच विविधरंगी फुलांची सजावट आणि रांगोळ्यांनी परिसर सजवण्यात आला होता. दहा दिवस चाललेल्या यात्रेत पाच लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.

भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन देवस्थान समिती, ग्रामस्थ आणि सेवाभावी संस्थांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. पोलीस बंदोबस्त, पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सुविधा, पार्किंग व्यवस्था, एकेरी वाहतूक आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली होती. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान या राज्यांतून आलेल्या भाविकांना कोणतीही अडचण भासली नाही.

Balumama Yatra Admapur
Balumama Yatra 2026 | लाखो भाविकांच्या मांदियाळीत बाळूमामांचा रथोत्सव संपन्न 

पालखी सोहळा विशेष :
यात्रेच्या शेवटच्या दिवशी बाळूमामांच्या पालखीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे, हलगी, लेझीम, बँडच्या तालावर तरुणाई दंग झाली होती, तर वारकरी भजनात तल्लीन झाले होते. सकाळी मंदिरातून निघालेली पालखी मरगुबाई मंदिर, हनुमान मंदिर तसेच विविध मार्गांवरून फिरत सायंकाळी पुन्हा मंदिरात स्थिरावली.

पालखी मार्गावर सुमारे पाच टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली होती. हजारो भाविक या सोहळ्यात रंगून गेले. मंदिर समितीचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले, कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी तसेच इतर पदाधिकारी, ग्रामस्थ आणि सेवाभावी संस्थांचे योगदान मोलाचे ठरले. हजारो स्वयंसेवकांनी सेवा बजावत यात्रेचे यश सुनिश्चित केले. शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news