

Balumama Admapur traffic planning
मुदाळतिट्टा : प्रशस्त पार्किंग व्यवस्था, नियोजनबद्ध एकेरी वाहतूक आणि पोलीस प्रशासन तसेच बाळूमामा देवालय समितीच्या समन्वयामुळे आदमापूर येथील बाळूमामा देवाची अमावस्या यात्रा यंदा वाहतूक कोंडीविना यशस्वीरीत्या पार पडली. “थोडे चालावे लागले तरी चालेल, पण बाळूमामांचे दर्शन समाधानकारक झाले,” अशा भावना व्यक्त करत भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.
गेल्या दोन दिवसांत या यात्रेस सुमारे चार लाख भाविकांनी उपस्थिती लावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यापैकी सुमारे ८० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
दरवर्षी अमावस्या यात्रेदरम्यान होणारी वाहतूक कोंडी ही मोठी समस्या होती. यंदा ही समस्या कायमची दूर करण्याचा निर्धार गारगोटीचे पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांनी केला. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांनी देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने नियोजनबद्ध तयारी केली.
देवस्थानाची उपलब्ध जागा तसेच काही खाजगी जागांचा वापर करून २० एकरांहून अधिक क्षेत्र पार्किंगसाठी उपलब्ध करण्यात आले. एकेरी वाहतुकीचे काटेकोर पालन करण्यात आले. मुदाळतिट्टा–कुर–वाघापूर पाटी आणि मुरगुड–सोनाळी–बिद्री हे दोन स्वतंत्र मार्ग कार्यान्वित ठेवल्यामुळे मंदिर परिसर वाहनमुक्त राहिला आणि भक्तांची शिस्तबद्ध मांदियाळी पाहायला मिळाली.
पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अली मुल्ला यांच्यासह ५० पोलीस कर्मचारी, ५ ट्रॅफिक पोलीस, २० होमगार्ड, ६० कमांडो आणि २२ वॉचमन तैनात करण्यात आले होते. निढोरी ते मुदाळतिट्टा दरम्यान पाच ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणतीही वाहतूक समस्या उद्भवली नाही.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी अजून काही त्रुटी आहेत. पार्किंगमध्ये वाहने लावण्याची सवय भाविकांना हळूहळू लागेल. उर्वरित त्रुटी दूर करून बाळूमामांचे दर्शन अधिक सुलभ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देवस्थान समितीच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले.
गोरख चौधरी, पोलीस निरीक्षक, गारगोटी
भाविकांनी सहकार्य करावे भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी देवालय समिती विविध पर्याय राबविणार आहे. पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्यास दर्शन कमी वेळात होऊ शकते. भाविकांनी सहकार्य करा
— धैर्यशील भोसले (अध्यक्ष) व पुंडलिक होसमणी (कार्याध्यक्ष), बाळूमामा देवालय समिती