Kolhapur Accident | दुचाकी अपघातात शिरढोण येथील तरुणाचा अपघाती मृत्यू

..एकजण गंभीर.. गडमुडशिंगी येथील घटना.
Kolhapur Accident
आफताब अब्बास मोमिन
Published on
Updated on

शिरढोण : कामावरून घरी परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात शिरढोण (ता. शिरोळ) येथील आफताब अब्बास मोमिन (वय १८) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याचा मित्र नुमेर खलील अन्सारी (वय १९) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे घडली.

घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी आफताब आणि नुमेर हे दोघे गडमुडशिंगी येथे किचन ट्रॉली तयार करण्याच्या कामासाठी गेले होते. शिरढोण येथील मुश्किले आसान दर्ग्याचा उरूस सुरू असल्याने त्यांनी काम लवकर आटोपून गावाकडे प्रस्थान केले होते. गडमुडशिंगीच्या मुख्य रस्त्यावर एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना त्यांच्या दुचाकीला धक्का लागून अपघात झाला. या अपघातात आफताबचा जागीच मृत्यू झाला. आफताब हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. उरूसाच्या आनंदोत्सवावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

उरूसाच्या काळात सलग दुसऱ्या वर्षी दुर्दैवी घटना

शिरढोण येथील मुश्किले आसान दर्ग्याचा उरूस सध्या सुरू आहे. गतवर्षीही उरूसाच्या काळात झालेल्या चारचाकी अपघातात गावातील सलमान सय्यद या तरुणाचा मृत्यू झाला होता. यंदाही उरूसादरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news