

गुडाळ : राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथे एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आणि स्वतःचा नुकताच लागलेला परीक्षेचा निकाल, अशा दुहेरी आनंदाच्या वातावरणात असतानाच, भोगावती नदीपात्रात पोहायला गेलेला कु. प्रेम सतीश बागडी (वय २३) हा तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाला. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अभ्यासात हुशार आणि मनमिळाऊ असलेल्या एकुलत्या एक मुलावर काळाने घाला घातल्याने बागडी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच आवळी बुद्रुक येथील स्थानिक तरुणांनी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत नदीपात्रात शर्थीचे प्रयत्न करत शोधमोहीम राबवली; मात्र अद्याप प्रेमचा शोध लागलेला नाही. गुरुवारी सकाळी रेस्क्यू टीमच्या मदतीने पुन्हा नव्या जोमाने शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. या तरुणाच्या शोधासाठी पाटबंधारे विभागाने राधानगरी धरणातून होणारा पाण्याचा विसर्गही सायंकाळपासून कमी केला आहे.
सतीश बागडी हे नोकरीनिमित्त आपल्या कुटुंबासह कुरुंदवाड येथे राहतात. काही कौटुंबिक कामाच्या निमित्ताने हे कुटुंब मूळ गावी म्हणजेच आवळी बुद्रुक येथे आले होते. अवघ्या एक दिवसापूर्वी म्हणजेच मंगळवारी प्रेमच्या 'बीसीए' (BCA) तृतीय वर्षाचा निकाल लागला होता आणि तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. त्यातच बुधवारी त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते.
दुपारच्या सुमारास प्रेम त्याच्या १० वर्षांच्या चुलत भावासोबत आवळी बुद्रुक ते आवळी खुर्द दरम्यान नदीवर बांधलेल्या नव्या पुलाजवळ आंघोळीसाठी गेला होता. सध्या नदीपात्र पाण्याने तुडुंब भरलेले असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात बुडू लागला. सोबत आलेल्या लहान भावाने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तातडीने नदीकडे धाव घेत शोधकार्य सुरू केले.
आपल्या एकुलत्या एक मुलाच्या विरहाने आणि या अकस्मात ओढवलेल्या संकटामुळे घटनास्थळी आलेल्या प्रेमच्या आई-वडिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.