

कुरुंदवाड : पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील वारकऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. उत्तम बाबासो पाटील (वय ५४) असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. मिरज-पंढरपूर मार्गावरील भोसे फाटा (ता. मिरज) येथे पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. वारीच्या वाटेवरच वारकऱ्याचा दुर्दैवी अंत झाल्याने सैनिक टाकळीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम पाटील हे पंढरपूरच्या वारीसाठी निघाले होते. भोसे फाटा येथे आले असता अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच एसआरएफ आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध मिरज ग्रामीण पोलीस घेत आहेत.