

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा येथील नदी मार्गावरून गारगोटीकडे जाणारा भरधाव मालवाहतूक ट्रक 10 फूट खाली शेतात कोसळला. सुदैवाने अपघातात चालकाचा जीव बचावला आहे. भरदुपारी उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावर गर्दी कमी असल्याने जीवितहानी टळली. ट्रकचा वेग इतका होता की, चालकाचा ताबा सुटल्यानंतर नदी मार्गावरून डाव्या बाजूने येणारा ट्रक चक्क उजव्या बाजूला येत रस्त्यावरून शेतात कोसळला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. ही घटना आज (शनिवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गावभाग पोलीस ठाण्यात नोंद नव्हती.
नदिनाका ते पंचगंगा काठ मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इचलकरंजीहून माल नसलेला ट्रक (के.ए. 23 ए. 3111) हा या मार्गावरून गारगोटीकडे लाकडे आणण्यासाठी जात होता. यावेळी भरधाव येणाऱ्या ट्रक चालकाचा अचानकपणे ताबा सुटला. चालकाने बचावाचा प्रयत्न केला. मात्र वेगात असल्याने ट्रक अचानकपणे रस्त्यावरच उलटला. उन्हामुळे भरदुपारी या मुख्य मार्गावर वाहनांची वर्दळ नव्हती. या अपघातामुळे सुदैवाने जीवित हानी टळली. या अपघातातून ट्रक चालक बचावला असून त्याच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.