कोल्हापूर: कडवी धरण ९१ टक्के भरले; विद्युत गृहातून १८० क्युसेक्स विसर्ग सुरू

कोल्हापूर: कडवी धरण ९१ टक्के भरले; विद्युत गृहातून १८० क्युसेक्स विसर्ग सुरू

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाई येथील कडवी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत १०५ मिली मीटर पाऊस बरसला. धरणात ९०.९१ टक्के पाणीसाठा संकलित झाला आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून कडवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. १ जून ते आजपर्यंत पाणलोट क्षेत्रात १८७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच दिवशी १९०१ मिमी पाऊस झाला होता. गतवर्षी १० ऑगस्टरोजी धरण १०० टक्के भरले होते. पाणीसाठयात वाढ होत असल्याने धरणातून कडवी नदीपात्रात प्रतिसेकंद १८० क्यूसेस पाण्याचा विसर्ग कडवी नदीत सुरू असल्याची माहिती येथील पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अजय पुनदीकर व उत्तम मोहिते यांनी दिली.

शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागात कोरडवाहू क्षेत्रासाठी वरदान ठरलेल्या कडवी धरणाची २.५१ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास पाणीपातळी ६०१.२५ मीटर तर पाणीसाठा ७१.२४ दलघमी असतो. सध्या कडवी मध्यम प्रकल्पात २.२९ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळात ८५ टक्के पाणीसाठा होता. परळे-निनाई ते पाटणे बंधारा दरम्यानच्या २२ गावांतील लाभक्षेत्राला सिंचन व पाणी पिण्यासाठी या धरणातील पाण्याचा उपयोग होतो. तालुक्याच्या पश्चिमेकडील पालेश्वर, कासार्डे व मानोली हे तीन लघू पाटबंधारे तलाव १९ जुलैपूर्वीच ओसंडून वाहत आहेत.

कडवी नदीवरील सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिरगाव, सवते-सावर्डे, पाटणे हे आठ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत.  कडवी नदीकाठच्या पिकांत पुराचे पाणी एकसारखे राहिल्याने नदीकाठची पिके धोक्यात आली आहेत. भेंडवडे, परळे-निनाई, पुसार्ळे, आळतूर, करूंगळे, लोळाणे, निळे, वालूर, कडवे, येलूर, पेरीड, मलकापूर, गाडेवाडी, कोपार्डे, शिरगांव, सांबू, मोळवडे, सावर्डे, सवते, सावे, पाटणे व शिंपे या २२ गावांना कडवी प्रकल्प जीवनदायी ठरला आहे. गतवर्षी धरण तीनदा ओव्हर फ्लो झाले होते. बुधवार (दि २६) सकाळी ७ वाजता धरणाची पाणीपातळी ५९९.८० मीटर होती. पाणीसाठा ६४.७६ दलघमी तर  २.२९ टीएमसी धरण भरले होते. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने दोन दिवसांत धरण ओव्हर फ्लो होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news