

सुनील सकटे
कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या साडेसात एचपीपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज योजनेचा जिल्ह्यातील 35 हजारांवर शेतकर्यांना लाभ होत आहे; मात्र तांत्रिक चुकीने साडेसात एचपीवरील शेतीपंपांना अद्याप हा लाभ मिळालेला नाही. सुमारे साडेनऊ हजारांवर शेतकरी या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने शेततकर्यांना मोफत विजेची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. साडेसात एचपीपर्यंत शेतकर्यांना मोफत वीज दिली जात आहे. सौरपंप योजना राबविण्यात येत आहे. हजारो शेतकर्यांना या सौर पंपांच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध होत आहे. याबरोबरच आता मोफत वीज योजना शेतकर्यांना फायद्याची ठरत आहे.
जिल्ह्यातील 35 हजार 684 शेतकर्यांना वीज बिल शून्य येत आहे. त्यामुळे शेतकर्यांतून समाधान व्यक्त होत आहे; मात्र ज्या शेतकर्यांनी मोटर बसविताना 7.51 ते 7.99 एचपी विद्युत भार पडला आहे, असे शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. यामध्ये साडेसात एचपीवरील भार चुकीने नोंद झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या शेतकर्यांनाही मोफत विजेचा लाभ द्यावा, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.
साडेसात एचपीवरील मोटर असणारे सुमारे साडेनऊ ते दहा हजार शेतकर्यांना तांत्रिक चुकीमुळे मोफत वीज योजनेचा लाभ मिळत नाही. हे शेतकरी लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. विद्युत भार जाग्यावर जाऊन तपासणीनंतर निर्णय घेण्याचे आदेश आहेत; मात्र ही पडताळणी कधी होणार, अशी विचारणा शेतकर्यांतून होत आहे.