कोल्हापूर : मनात धाकधूक.. हुरहुर.. चेहर्यावर थोडासा तणाव; मात्र परीक्षा संपल्यानंतर हुश्श.. म्हणत सुटकेचा निःश्वास सोडत पेपर सोपा गेल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. निमित्त होते दै. ‘पुढारी’ व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दै. ‘पुढारी’ टॅलेंट सर्च परीक्षेचे. राज्य शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षेच्या धर्तीवर शुक्रवारी झालेल्या ‘पुढारी’ टॅलेंट सर्च एक्झामला शहर, जिल्ह्यातून सुमारे 22 हजारांहून अधिक विद्यार्थी बसले होते.
दै. ‘पुढारी’ व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच दै. ‘पुढारी’ टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू होती. यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक व शिक्षण विभागातील अधिकार्यांची कार्यशाळा घेऊन परीक्षेसंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पर्यवेक्षकांसह भरारी पथक नियुक्त करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यालय, नेहरूनगर विद्यालय, टेंबलाईवाडी विद्यालय, यशवंतराव चव्हाण विद्यालय, झाकीर हुसैन उर्दू मराठी विद्यालयासह ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांवर सकाळपासूनच विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी होती. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालक आल्याने शाळा परिसर गर्दीने फुलून गेला होता.
परीक्षेला लागणारे शैक्षणिक साहित्य बरोबर घेतले आहे की नाही, याची पालक परीक्षेला जाण्यापूर्वी पाल्याकडून खात्री करून घेत होते. परीक्षा केंद्रावर गेल्यावर कोणत्या वर्गात बैठक क्रमांक आहे याची विद्यार्थी, पालक खातरजमा करीत होते. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी मित्रांसमवेत शिष्यवृत्ती परीक्षेची उजाळणी केली. परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी ‘पेपर व्यवस्थित वाचून सोडव, काळजी करू नको’ अशा सूचना पालकांनी दिल्या. सकाळी 11 वाजता शाळेची घंटा होऊन परीक्षेला सुरुवात झाली. चौथी व सातवीचे विद्यार्थी परीक्षेला बसले. मराठी, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी यावर आधारित दोन तासांची परीक्षा होती. दोनशे गुणांसाठी विद्यार्थ्यांना शंभर प्रश्न विचारण्यात आले होते. पेपर सुरू झाल्यापासून अनेक पालक परीक्षा केंद्राच्या परिसरात मिळेल तेथे झाडाच्या सावलीमध्ये बसले होते. दुपारी एक वाजता पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पालकांना मिठ्ठी मारून पेपर सोपा गेल्याचे सांगत आनंदोत्सव साजरा केला.
दै. ‘पुढारी’च्या वतीने प्रबोधन, जनजागृतीबरोबरच समाजहिताचे अनेक उपक्रम राबविले जातात. याच्या माध्यमातून राबविलेल्या अनेक उपक्रमांतून आजपर्यंत अनेक गरजूंना मोठी मदत मिळाली आहे. यावर्षी झालेल्या दै. ‘पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम’मधून चौथी व सातवीचे अनुक्रमे प्रथम येणार्या तीन विद्यार्थ्यांना दुबईची शैक्षणिक सहल घडवून आणली जाणार आहे.
दै. 'पुढारी' टॅलेंट सर्च परीक्षेवेळी शहरातील केंद्रांवर पाल्यासोबत पालकांनी मोठी गर्दी केली होती. मुलांचा शिष्यवृत्तीचा पेपर असल्याने काही पालकांनी कामावर रजा घेतली होती. परीक्षेपूर्वी 'पेपर पूर्ण सोडव, सर्व प्रश्न व्यवस्थित समजावून घे' अशा सूचना पालक परीक्षा केंद्रात जाईपर्यंत विद्यार्थ्यांना देत होते. पेपर संपेपर्यंत पालक परीक्षा केंद्राबाहेरच बसून होते.
आतकिरवाडी (ता. पन्हाळा) येथील चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या सायली संभाजी भोसले या विद्यार्थिनीच्या वडिलांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून सायली हिने कळे केंद्रावर दै. 'पुढारी' टॅलेंट सर्च परीक्षा दिली.
दै. 'पुढारी' टॅलेंट सर्च परीक्षा अतिशय पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोडल ऑफिसर नियुक्त केले होते. पर्यवेक्षकही दुसऱ्या केंद्रामधील देण्यात आले होते. शिष्यवृत्ती परीक्षा 'ओएमआर' शीटवर घेण्यात आली. परीक्षेचा निकाल संगणक पद्धतीने लावला जाणार आहे. लवकरच याची घोषणा दै. 'पुढारी' वृत्तपत्रातून जाहीर केली जाणार आहे.
दै. 'पुढारी' टॅलेंट सर्च परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरली. परीक्षेमुळे सामान्य ज्ञानासह स्पर्धा परीक्षेची कशी तयारी करायची, याचे मार्गदर्शन लाभले. दै. 'पुढारी'ने परीक्षेपूर्वी दिलेल्या पुस्तकांचा परीक्षेला फायदा झाला. पेपर अतिशय सोपा गेला, याचा आनंद आहे.
फातेमा काझी, झाकीर हुसैन उर्दू मराठी विद्यालय
दै. 'पुढारी' टॅलेंट सर्च परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा सराव झाला. विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली. अशा प्रकारच्या परीक्षा दरवर्षी घेतल्या जाव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकण्यास मदत होईल.
- हर्षल सावंत, नेहरूनगर विद्यालय, कोल्हापूर
शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास केला होता. सुरुवातीला पेपर अवघड जाईल, अशी भीती होती; परंतु पेपर सोपा गेला. प्रश्नपत्रिकेमधील म्हणी, मराठी उतारे सोपे गेले. या परीक्षेमुळे स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी झाली आहे.
- आर्या चराटे, लक्ष्मीबाई जरग विद्यालय
सरकारी अधिकारी होण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी पुढे मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा लागेल; मात्र शाळेत असतानाच झालेल्या 'पुढारी'च्या या टॅलेंट सर्च परीक्षेमुळे माझा आत्मविश्वास आणि तयारी वाढली आहे. मला या परीक्षेचा भविष्यात नक्की फायदा होईल.
- वेदांती पाटील, विद्यामंदिर