

कोल्हापूर : सलग सहा महिने रेशनवरील धान्याची उचल न केलेल्या जिल्ह्यातील 20 हजार 310 जणांचे रेशनवरील धान्य बंद होणार आहे. या व्यक्तींचे धान्य प्राधान्य योजनेतील प्रतीक्षा यादीतील कार्डधारकांना दिले जाणार आहे. तत्पूर्वी, पुन्हा एकदा या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे.
केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत सर्व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड 35 किलो आणि प्राधान्य योजनेतील प्रतिसदस्य पाच किलो मोफत धान्य दिले जाते. केशरी कार्डधारकांपैकी 76 टक्के कार्डधारकांना प्राधान्य योजनेचा लाभ दिला जातो. याकरिता शहरी भागातील कार्डधारकांसाठी वार्षिक 59 हजार रुपये, तर ग्रामीण भागातील कार्डधारकांसाठी 44 हजार रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे. त्यानुसार दरवर्षी प्राधान्य योजनेतील अनेक लाभार्थी धान्य मिळावे, यासाठी प्रतीक्षेत असतात.
रेशन कार्डधारकांना मोफत दिल्या जाणार्या धान्याचा अनेकजण गैरवापर करत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. यासह अनेकजण या योजनेचे लाभार्थी असूनही धान्य उचलत नाहीत, अशा ग्राहकांचे धान्य बंद करून ते इतर प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना देण्यात यावे, असे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने ई-पॉस मशिनवरून वितरित माहितीच्या आधारे सलग गेल्या सहा महिन्यांत धान्याची उचल न केलेल्या 9 हजार 246 कार्डातील 20 हजार 310 जणांची यादी तयार केली आहे. या यादीच्या आधारे, संबंधितांची खात्री करून घेतली जाणार आहे. त्यानंतर या सर्वांचे धान्य बंद केले जाणार आहे. त्यानंतर हे धान्य प्रतीक्षा यादीवरील कार्डधारकांना देण्यात येणार आहे. यामुळे धान्याचा कोटा वाढवून न मिळताही गरजूंना लाभ मिळणार आहे.
जिल्ह्यात तीनवेळा मुदतवाढ देऊनही तब्बल वर्षभर सुरू असलेल्या प्रक्रियेनंतरही 3 लाख 88 हजार 314 जणांची रेशन कार्डाची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही. जिल्ह्यात 21 लाख 33 हजार 211 जणांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. ई-केवायसीबाबत पुन्हा मुदतवाढीची मागणी होत आहे. मात्र, याबाबत निर्णय झालेला नाही.