

कोल्हापूर : तुळशी विवाहाच्या निमित्ताने घरोघरी तुळशीच्या रोपांची खरेदी केली जाते. तसेच पर्यावरणप्रेमी संस्था, व्यक्ती यांच्यामार्फत तुळशीच्या रोपांचे वाटप केले जाते. यासाठी तुळशीच्या रोपांची वाढती मागणी लक्षात घेत शहरातील नर्सरींच्या मातीत हजारो तुळशी रोपे फुलली आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तुळशीची रोपे खरेदी करण्यासाठी गर्दी झाली. गेल्या तीन महिन्यांपासून 20 हजारांवर तुळशी रोपे तयार करण्यात आली आहेत.
कार्तिकी द्वादशीला तुळशी विवाहाचा सण सर्वत्र साजरा केला जातो. तुळशी विवाहाच्या सोहळ्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दीपोत्सवाने दिवाळीची सांगता होते. तुळशी विवाहापूर्वी घरातील तुळशी वृंदावन आणि तुळशी रोपाची सजावट केली जाते, तर काही महिला तुळशीच्या नवीन रोपाचे पूजन करून तुळशी विवाह साजरा करतात. दरवर्षी तुळशी विवाहापूर्वी तुळशीच्या रोप खरेदीसाठी नर्सरीकडे मोर्चा वळवला जातो. त्यासाठी सर्व नर्सरींमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांपासूनच तुळशीची रोपे तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते.
कोल्हापूर शहरात साधारणपणे 25 नर्सरी आहेत. या ठिकाणी तुळशी विवाहाच्या पूर्वसप्ताहातच तयार झालेल्या रोपांची मांडणी केली जाते. यामध्ये कुंडीसह तुळशी रोप तसेच फक्त मातीत रुजवलेले रोप अशा दोन प्रकारांचा समावेश असतो. तुळशी मंजुळांपासून रोप तयार होण्यासाठी किमान तीन महिन्यांचा अवधी लागतो.
मातीचा गादी वाफा तयार केला जातो.
त्यात शास्त्रीय पद्धतीने मंजुळा पेरल्या जातात.
त्यातून कोंब फुटले की, सावलीत जतन केले जाते.
रोपाला योग्य पाणी व सूर्यप्रकाश दिला जातो.
तीन महिन्यांत रोप वाढीसाठी तयार होते.
अशी घ्या तुळशीची काळजी
तुळस योग्य प्रकारे सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवा.
तुळस पूर्णवेळ सावलीमध्ये ठेवू नका.
तुळशीच्या मंजिरींची वेळोवेळी सफाई करा.
कुंडीतील माती भिजेल इतकेच पाणी द्या.