कोल्हापूर : किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्यात आली. याचा जिल्ह्यातील 2 लाख 86 हजार शेतकर्यांना फायदा होणार आहे. या शेतकर्यांना सात टक्के दराने पाच लाखांपर्यंत शेतीसाठी कर्ज उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकर्यांची संख्या 2 लाख 86 हजारांवर आहे. या कार्डधारक शेतकर्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज मिळत होते. आता मात्र त्यात दोन लाखांची वाढ केली आहे. यामुळे अशा कार्डधारक शेतकर्यांना पाच लाखांपर्यंत पिकांसाठी कर्ज घेता येणार आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांना तीन लाखांपेक्षा जादा कर्जाची आवश्यकता असते. त्याकरिता मात्र त्यांना जादा व्याजदराचा भुर्दंड सहन करावा लागत होता. आता मात्र या घोषणेने तीन लाखांपर्यंत मिळणारे कर्ज यापुढे पाच लाखांपर्यंतचे मिळणार असून तेही पूर्वीप्रमाणे सात टक्के व्याजदरानेच उपलब्ध होणार आहे. अनेक शेतकर्यांना पाच लाखांपेक्षाही जादा कर्जाची आवश्यकता असते, त्यांनाही आता या नव्या घोषणेने पाच लाखांपर्यंत तरी दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकर्यांकडून कर्ज घेण्याचेही प्रमाण चांगले आहे. त्याबरोबरच त्याच्या परतफेडीचेही प्रमाण चांगले आहे. किसान क्रेडिट कार्डवरून पाच लाखांपर्यंत कर्ज घेतले आणि त्याची वेळेवर परतफेड केली, तर तीन टक्के व्याजाचा परतावाही मिळणार आहे. यामुळे शेतकर्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.