

कोडोली : कोडोली येथील गायकवाड गल्ली परिसरात गुरुवारी सकाळी शाळेत जात असताना श्रेयश अमोल सूर्यवंशी (वय 13) या सहावीच्या विद्यार्थ्याचे दोन अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले. त्याला बेशुद्ध करून गावाबाहेरील शेतात टाकून अपहरणकर्ते पसार झाले. काही तासांनंतर श्रेयश शेतातील हत्तीग्रास गवतामध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आला.
श्रेयश वारणानगर येथील वारणा विद्या मंदिर शाळेत सहावीत शिकतो. गुरुवारी सकाळी सात वाजता तो शाळेसाठी घरातून निघाला होता. गायकवाड गल्लीच्या तोंडाशी मोटारसायकलवर थांबलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला अडवले. आरडाओरड केल्यास ठार मारण्याची धमकी देत त्याला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवले. गावाबाहेर नेल्यानंतर त्याच्या तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील शेतातील गवतामध्ये त्याला टाकण्यात आले.
दरम्यान, श्रेयश शाळेत न पोहोचल्याने शिक्षकांनी त्याच्या घरी संपर्क साधला. कुटुंबीयांसह गल्लीतील नागरिकांनी शोधमोहीम सुरू केली. अखेर श्रेयशचा एक मित्र ऊसतोडीसाठी शेतात गेला असताना गवतामधून येणार्या आवाजामुळे त्याला श्रेयश बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याला तातडीने घरी आणण्यात आले.
संशयितांचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रेयशवर उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. अपहरणामागील कारण व संशयित आरोपींचा शोध घेण्याचे आवाहन श्रेयशच्या पालकांनी केले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.