

कोल्हापूर : टेंबलाईवाडीकडून महामार्गाच्या दिशेने जाणार्या खासगी ट्रॅव्हल्सने मोपेडस्वाराला जोरात ठोकरल्याने झालेल्या अपघातात कोल्हापूर महापालिकेतील केएमटी चालक रमेश हरिश्चंद्र राठोड (वय 53, रा. शिंदे कॉलनी, उचगाव, ता. करवीर) यांचा जागीच अंत झाला. शुक्रवारी सकाळी 6 वाजता उचगाव येथील कमानीजवळ ही घटना घडली. गांधीनगर पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाला ताब्यात घेतले आहे.
भरधाव ट्रॅव्हल्सने मोपेडस्वार राठोड यांना काही अंतर फरफटत नेले. त्यामुळे रस्त्यावर रक्ताचे थारोळे साचले होते. डोके, हातासह पायाला गंभीर इजा झाली. त्यात राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीय, नातेवाईकांसह केएमटीमधील चालक, वाहकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गांधीनगर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. राठोड हे केएमटीकडे चालक म्हणून 25 वर्षांपासून कार्यरत होते. ड्युटीवर जाण्यासाठी शुक्रवारी सकाळी 6 वाजता शिंदे कॉलनी येथील घरातून मोपेडवरून बाहेर पडल्यावर हा अपघात झाला.
बेशुद्धावस्थेत राठोड यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांनी मृतदेहाचा ताबा घेतला. कर्नाटकातील विजापूर येथे सायंकाळी पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले.