

सतीश सरीकर
कोल्हापूर : केंद्र सरकारने महापालिकेला आणखी 50 इलेक्ट्रिक बसेसची मंजुरी दिली आहे. यापूर्वी 19 ऑक्टोबर 2023 ला 100 बसेस मंजूर झाल्या. त्यामुळे एकूण 150 इलेक्ट्रिक बसेस केएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. परिणामी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होणार असून केएमटीच्या आर्थिक स्थितीमध्येही सकारात्मक बदल अपेक्षित आहे. यामुळे केएमटीची गाडी पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आहे.
शहरात वाहनांचे वाढते प्रमाण, वाहतुकीची कोंडी, वायू प्रदूषण आणि इंधन दरवाढ या अडचणी आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक बसेसचा समावेश हे निश्चितच क्रांतिकारी पाऊल आहे. या बसेस बॅटरीवर चालत असल्याने प्रदूषणमुक्त आहेत. त्यातील काही बस येत्या महिन्यात प्रत्यक्ष सेवेत येणार आहेत. त्यामुळे शहराच्या ग्रीन सिटी व्हिजनला हातभार लावणार्या ठरणार आहेत. विद्यार्थी, नोकरदार वर्ग, महिला प्रवासी यांना मोठा फायदा होणार आहे. काही वर्षांपासून केएमटी आर्थिक अडचणीत आहे. जुना बस ताफा, वाढता देखभाल खर्च आणि कर्मचारी वेतनामुळे व्यवस्थापनावर ताण पडत आहे. मात्र इलेक्ट्रिक बसमुळे केएमटीला दिलासा मिळणार आहे. खासगी भागीदारीतून किंवा पीपीपी मॉडेलच्या आधारावर बसेस चालवण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रिक वाहिन्यांसह चार्जिंग स्टेशन व इतर सुविधांसाठी 18 कोटी रुपये मंजूर झाले. शहरात काही प्रमुख ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. तांत्रिक प्रशिक्षित कर्मचार्यांची भरती आणि बस चालकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. महापालिकेला केंद्र सरकारकडून मिळालेली ही इलेक्ट्रिक बसेसची भेट म्हणजे पर्यावरणपूरक, सक्षम आणि आधुनिक कोल्हापूरकडे नेणारे एक मोठे पाऊल आहे. केएमटीसारख्या अडचणीत असलेल्या संस्थेला याचा मोठा फायदा होणार असून, शहरातील नागरिकांसाठीही ही एक सकारात्मक गोष्ट ठरणार आहे. ही संधी साधून महापालिकेने आणि केएमटीने भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सुटसुटीत ठेवण्याची गरज आहे.
प्रदूषणात घट : इलेक्ट्रिक बसमुळे शहरातील वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल.
इंधन खर्चात बचत : डिझेलवर चालणार्या जुन्या बसेसच्या तुलनेत इलेक्ट्रिक बस चालवणे अधिक स्वस्त आहे. त्यामुळे केएमटीच्या खर्चातही मोठी कपात होईल.
प्रवास अधिक आरामदायी : नवीन बसेस आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार असून प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी सेवा मिळेल.
महिलांसाठी सुरक्षितता : अनेक इलेक्ट्रिक बसेस महिला प्रवाशांसाठी विशेष सुविधा (सीसीटीव्ही, जीपीएस ट्रॅकिंग, आपत्कालीन बटण) असलेल्या असतील.
शहराच्या अर्थव्यवस्थेला चालना : चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्यास नागरिकांची हालचाल वाढते, त्यामुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळते.