

कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीत राष्ट्रवादीत माजी संचालक किसन चौगले यांनी बंडखोरी करत विरोधी राजर्षी शाहू समविचारी आघाडीत प्रवेश केला. आ. सतेज पाटील यांची त्यांनी अजिंक्यतारा कार्यालयात कार्यकर्त्यांसह भेट घेतली. यावेळी आ. पाटील यांनी चौगलेंसह राधानगरी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यानंतर आ. पाटील यांनी चौगले यांची समविचारी आघाडीकडून उमेदवारी जाहीर केली.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘गोकुळ’ निवडणुकीत राधानगरी तालुक्यातून किसन चौगले यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील गटाचे नाव पुढे आले. पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने चौगले गटात प्रचंड नाराजी पसरली. गुरुवारी सकाळी बिद्री कारखाना येथे चौगले गट एकत्र आला. त्यानंतर त्यांनी आ. सतेज पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ए. वाय. पाटील गटाला उमेदवारी देताना आपणाला विश्वासात घेतले नसल्याचे सांगितले. सकाळपर्यंत उमेदवारी निश्चित असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, यातील अंडरकरंट वेगळे असल्याने कार्यकर्त्यांनी समविचारी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते असल्याने हा निर्णय घेतल्याचे चौगले यांनी सांगितले. यावेळी उमेश भोईटे, राजू बटाले, विश्वास पाटील, सर्जेराव पाटील आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
‘गोकुळ’च्या घडामोडींचे ‘बिद्री’त हादरे
किसन चौगले यांची उमेदवारी नाकारल्याने तालुक्यात नाराजी निर्माण झाली. बिद्री कारखान्यातही कार्यकर्त्यांनी गोंधळ केला. चौगले यांच्यासोबत बिद्री कारखान्याचे पाच संचालक गेले आहेत. तर आ. सतेज पाटील गटाचे सात संचालक कारखान्यात आहेत. त्यामुळे ‘गोकुळ’च्या घडामोडींचे हादरे बिद्री कारखान्यातही बसले आहेत.