

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील गोळीवडे येथील कंक दाम्पत्याच्या खुनातील मारेकऱ्याने रत्नागिरी जिल्ह्यातील रायपाटण (ता. राजापूर) येथील एका वृद्धेचा खून केल्याचे पोलिसांच्या चौकशीतून सोमवारी स्पष्ट झाले. त्यानंतर दोन दिवसांनी कंक दाम्पत्याची त्याने हत्या केली. या प्रकारानंतर संशयिताने घरफोडी, चोरीचे गुन्हेही केल्याची माहिती पुढे आली आहे.
मारेकरी विजय मधुकर गुरव (वय 48, रा. शिरगाव, ता. शाहूवाडी) याचा रत्नागिरी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी कारागृहातून ताबा घेतला. रत्नागिरी पोलिसांच्या चौकशीत रायपाटण येथील वैशाली शांताराम शेट्ये (वय 75) यांचा गळा आवळून खून केल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे.
या घटनेनंतर संशयित तेथून पसार झाला. दोन दिवसांनंतर त्याने शाहूवाडी तालुक्यातील गोळीवडे येथील निनू कंक (वय 70) व रखुबाई कंक (65) यांचा खून केल्याचे यापूर्वीच उघडकीला आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित कैद झाला असून त्याआधारे रत्नागिरी पोलिसांनी या गुन्ह्यांचा छडा लावला.