

पेठवडगाव : मतदान सुरू असताना बेकायदेशीर जमाव जमवून बंदी आदेशाचे उल्लंघन करत पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद महिला उमेदवारासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय बापूसाहेब पाटील, उमेदवार ऐश्वर्या अजय पाटील, अभिलाष बाबासाहेब पाटील, राजवर्धन चव्हाण, युवराज पाटील व अभयसिंह पाटील (सर्व रा. खोची) व अन्य तिघांवर गुन्हा दाखल झाला. शनिवारी खोची येथील कन्या शाळा मतदान केंद्रावर अभिलाष बाबासो पाटील बोलत थांबला होता. त्या ठिकाणी उपनिरीक्षक पाटील यांनी अभिलाष याला मतदान झाल्यानंतर केंद्रातून बाहेर जाण्यास सांगितले असता त्याने पाटील यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केली.
त्यांना ढकलून देऊन धक्काबुक्की करत ‘तू बाहेर ये तुला संपवतो’ अशी धमकी दिली. याचवेळी तिथे आलेल्या अजय पाटील, राजवर्धन चव्हाण, युवराज पाटील, अभयसिंह पाटील व अन्य तीन अनोळखी लोकांनी पाटील यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. या घटनेचे मोबाईल चित्रीकरण करणार्या हेडकॉन्स्टेबल सारिका मोटे यांचा मोबाईल राष्ट्रवादीच्या उमेदवार ऐश्वर्या अजय पाटील यांनी हिसकावून फेकून देत त्यांनाही धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणला.
अधिक तपास उपनिरीक्षक हिले करत आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड पोलीस फौजफाटा खोची येथे दाखल झाला. त्यांनी संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण सर्व संशयित फरार असल्याचे सांगण्यात आले.