

जमीर पठाण
कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेली जीर्णोद्धार व सुशोभीकरणाची कामे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. हा विषय केवळ स्थानिक प्रश्न नसून, वारशाच्या जतनाबाबतच्या दृष्टिकोनावरच प्रश्नचिन्ह उभा करणारा आहे. विकास आणि जतन यांचा समतोल राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना, येथे मात्र पारदर्शकतेचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.
मंदिर परिसरात यापूर्वी चांदीची नाणी सापडल्याने या ठिकाणी कोणतेही काम करताना पुरातत्त्व विभागाचे कडक नियम लागू होणे अपेक्षित आहे. मात्र, हे नियम प्रत्यक्षात कितपत पाळले जात आहेत, याबाबत शंका निर्माण होत आहे. देखरेखीअभावी कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून, ऐतिहासिक ठिकाणी आवश्यक त्या नियंत्रण यंत्रणांचा अभाव जाणवत आहे.
या ठिकाणची गंभीर बाब म्हणजे, रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरच्या साहाय्याने माती काढली जात असल्याची चर्चा आहे. अशा पद्धतीने यंत्रसामग््राीचा वापर केल्यास जमिनीखालील मौल्यवान पुरातत्त्वीय अवशेष कायमचे नष्ट होण्याची शक्यता आहे. ही वेळ दोषारोपांची नसून, येथे होणारे प्रत्येक काम खुले, पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने होणे अत्यावश्यक आहे.
पारदर्शकतेचा अभाव अन् प्रशासकीय आलबेल
केवळ आश्वासनांचे ‘कोट’ देण्यापेक्षा, देखरेखीसाठी ठोस यंत्रणा नसल्याने या विकासकामांत नेमके काय दडले आहे, याबाबत संभमावस्था निर्माण झाली आहे.