

रवींद्र डोंगरे
कोल्हापूर : यंदाच्या खरिप हंगामात रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्र निष्क्रिय ठरला. गतवर्षी १६ जूनपर्यंत ७० मि.मी. पाऊस झाला होता. यंदा अत्यल्प म्हणजे २७.४ मि.मी. पाऊस झाला आहे. ही तूट तब्बल ७४ टक्के इतकी आहे. खरीप हंगाम संकटाच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे. पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. अल निनोच्या सावटाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक दृष्टचक्रात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य शासनाने पुरेसा पाऊस पडून जमीन ओली झाल्यास पेरणी करू नये, असे आवाहन केले आहेत; अन्यथा दुबार पेरणी करण्याचे संकट निर्माण होते. अल निनोचे संकट असल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या सूचना लक्ष्यात घ्याव्यात, असे आवाहन केले आहे. कृषी विभागाने खरीप हंगाम २०२६ साठी पेरणीचे नियोजन केले आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी क्षेत्रात वाढ दिसत आहे. मात्र अद्याप दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.
खते, बियाणे दररवर्षी विक्रेत्यांना कंपन्यांकडून क्रेडिटवर ॲडव्हान्स रक्कम न भरताही दिले जायचे. मात्र, यंदा कंपन्यांकडून ॲडव्हान्स रक्कम घेतल्याशिवाय बियाणे, खते दिले जात नाहीत. अद्याप पाऊस सुरू न झाल्याने लाखो रुपये भरून खते बियाणे दुकानात आणून ठेवले आहेत, पण मागणी नसल्याने विक्रेतेही अडचणीत सापडले आहेत.
यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्याचा थेट परिणाम जनावरांसाठी आवश्यक असलेल्या हिरव्या चाऱ्यावर होत असून, अनेक ठिकाणी चारा करपू लागला आहे. त्यामुळे आगामी काळात दूध उत्पादनात घट होण्याची भीती दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांना बाहेरून महागड्या दराने चारा खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
मृग नक्षत्रात पेरणी झाल्यास रब्बी हंगामातील पिकांसाठी पुढील रान लवकर उपलब्ध होते. मृगातील पेरणी सर्वाधिक फायदेशी, उशिरा पेरणीमुळे उत्पादन घटते, रोग-कीडीचा प्रादुर्भाव वाढतो, उत्पादन खर्च वाढते, उशिरा परेणी झाल्यास पुनर्रपेरणीचा धोका वाढतो. दुबार पेरणीमुळे लागवड खर्चात वाढ होते.
2026 मध्ये १६ जूनपर्यंत महाराष्ट्रात केवळ २७.४ मिमी पाऊस झाला असून तो सामान्यच्या फक्त २६ टक्के आहे.
2026 मध्ये १ ते १६ जून दरम्यानहवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात सामान्यपेक्षा ७५ टक्के कमी पाऊस झाला.
2024 मध्ये कोकणात चांगला पाऊस झाल्याने राज्यातील स्थिती तुलनेने समाधानकारक होती.
2025 मध्ये मान्सूनचा प्रारंभ चांगला झाला होता आणि १६ जूनपर्यंत राज्यातील पाऊस सरासरीपेक्षा किंचित जास्त होता..
2026 हे गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक कोरडे जूनपैकी एक वर्ष मानले जात आहे.