

कोल्हापूर : अटीतटीच्या अंतिम सामन्यात संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल संघाची शर्थीची झुंज व्यर्थ ठरवत खंडोबा तालीम मंडळाने त्यांचा 4 विरुद्ध 0 अशा गोलफरकाने धुव्वा उडवत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. फुटबॉलप्रेमी कै. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्मरणार्थ बालगोपाल तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर झाली.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच जुना बुधवारकडून जलद व आक्रमक खेळाचा अवलंब करण्यात आला, तर खंडोबा तालीम मंडळाने सावध व तितकाच शांत खेळ केला. जुना बुधवारने लोगोपाठ चढाया करून आघाडीसाठी प्रयत्न सुरू ठेवले. अभिजित साळोखे, रविराज भोसले, सनवीर सिंग, टी. एम. विष्णू, हर्ष जरग यांच्या चढाया अपयशी ठरल्या. खंडोबाकडून दोन-तीन वेळाच खोलवर चढाया झाल्या. मात्र, त्या त्यांनी यशस्वी केल्या. 19 व्या मिनिटाला संकेत मेढे याने मोठ्या डीतून डाव्या पायाने मारलेल्या फटक्यावर गोलपोस्टचा अचूक वेध घेतला. यानंतर 40+6 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत संकेत मेढेच्या पासवर अमीन खजीर याने सहजसोप्या नेत्रदीपक गोलची नोंद करून मध्यंतरापर्यंत खंडोबाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धातही जुना बुधवारचा आक्रमक पवित्रा कायम होता. सचिन मोरे, रोहित मंडलिक, संकेत जाधव, हर्ष जरग यांनी गोल फेडण्यासाठी जोरदार चढाया सुरू ठेवल्या. मात्र, खंडोबाचा भक्कम बचाव आणि गोलरक्षक देबोजित घोषाल यांच्या भक्कम बचावामुळे जुना बुधवारला गोल करता आले नाहीत. सामन्यातील उत्तरार्धाची वेळ संपली पंचांनी 6 मिनिटांचा जादा वेळ दिल्या. या वेळेचा आणि मिळालेल्या संधीचा फायदा उठवत खंडोबाने आणखी दोन गोल डागले. 82 व्या मिनिटाला अमीन खजीरच्या पासवर रोहित जाधवने गोल केला, तर 84 व्या मिनिटाला अमीन खजीरने वैयक्तिक दुसरा व संघाकरिता चौथ्या गोलची नोंद केली. यापैकी एकाही गोलची परतफेड जुना बुधवारकडून न झाल्याने सामना खंडोबाने 4-0 असा जिंकला.
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, माजी आ. सुजित मिणचेकर यांनी मैदानात उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले, तर अंतिम सामन्यानंतर बक्षीस समारंभ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव, माजी नगरसेवक संभाजी जाधव, ऋतुराज क्षीरसागर, उद्योजक सत्यजित जाधव, मानसिंगराव खोराटे, राजन सातपुते, संजय कदम, कमलाकर जगदाळे यांच्या हस्ते झाला. संयोजन तालमीचे अध्यक्ष राजू कुरणे, निवासराव शिंदे, आप्पासो साळोखे, युवराज कुरणे, राहुल चव्हाण, कपील मोहिते व सहकार्यांनी केले. फुटबॉल निवेदक म्हणून विजय साळोखे यांनी काम पाहिले.
विजेता : खंडोबा तालीम मंडळ - 2 लाख 31 हजार रुपये व मानाचा चंद्रकांत चषक
उपविजेता : संयुक्त जुना बुधवार पेठ संघ - 1 लाख 31 हजार व चंद्रकांत चषक
उपांत्य फेरीतील पराभूत संघ - वेताळमाळ व बालगोपाल तालीम - प्रत्येकी 31 हजार
मालिकावीर व सामनावीर : अमीन खजीर (खंडोबा तालीम) 31 हजार व 3100 रुपये
उत्कृष्ट फॉरवर्ड : संकेत मेढे (खंडोबा तालीम) - 11 हजार व स्मृतिचिन्ह
उत्कृष्ट हाफ : हर्ष जरग (जुना बुधवार पेठ) - 11 हजार व स्मृतिचिन्ह
उत्कृष्ट डिफेन्स : रोमेन सिंग (बालगोपाल तालीम) - 11 हजार व स्मृतिचिन्ह
उत्कृष्ट गोलरक्षक : देबोजित घोषाल (खंडोबा तालीम) - 11 हजार व स्मृतिचिन्ह