

कोल्हापूर ः शहरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रखडलेल्या पुनर्बांधणी कामामुळे रंगकर्मींच्या नाराजीला अखेर महापालिका प्रशासनाने आणि ठेकेदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सोमवारी झालेल्या संयुक्त बैठकीत 27 मार्च 2026 जागतिक रंगभूमी दिनापूर्वी नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. 27 मार्चला रंगभूमीदिना दिवशी नाट्यप्रयोग सादर करण्याची संधी मिळावी, असा आग्रह रंगकर्मींनी धरल्यानंतर प्रशासनाने हे आश्वासन दिले.
महापालिका अधिकारी, ठेकेदार, सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी आणि रंगकर्मी यांची ही बैठक अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, स्ट्रक्टवेल कंपनीचे चेतन रायकर, ठेकेदार कंपनीचे श्रीनिवासन, तसेच रंगकर्मी आनंद काळे, सुनील घोरपडे, रोहन घोरपडे, विजय पाटील, किरण चव्हाण, रघुराज पवार, सुभाष गुंदेशा आदी उपस्थित होते.
बैठकीत रंगकर्मींनी मांडलेल्या अनेक मागण्या चर्चेत आल्या. खुर्च्यांची संख्या पूर्वीप्रमाणे वाढवावी, तसेच कलादालनाकडे जाणार्या जिन्याचे नूतनीकरण करावे, अशा मागण्यांना रंगकर्मींनी विशेष महत्त्व दिले. सल्लागार कंपनीचे चेतन रायकर म्हणाले, पहिल्या टप्प्यातील काम 95 टक्के, तर दुसर्या टप्प्यातील काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. तिसर्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार असून, चौथ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. पावसामुळे उशीर झाला असला, तरी पुढील काळात वेगाने काम करून 27 मार्चपर्यंत नाट्यगृह रंगकर्मींसाठी उपलब्ध करून दिले जाईल. कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी दर आठवड्याला एक बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीला विपुल देशमुख, संजय मोहिते, समीर म्हाब—ी, अनुराधा वांडरे, सुरेश पाटील, सुनील माने, किरणसिंह चव्हाण, अजय खाडे यांच्यासह अनेक रंगकर्मी उपस्थित होते.