

कोल्हापूर ः संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातील महापालिकेच्या दुकान गाळेधारकांची याचिका सर्किट बेंचने गुरुवारी फेटाळली. न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी हे आदेश दिले. महापालिकेच्या वतीने अॅड. अभिजित आडगुळे यांनी बाजू मांडली.
नाट्यगृह आगीत भस्मसात झाल्यानंतर नूतनीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळाला आहे. नाट्यगृहाला लागून खासबाग मैदानाच्या मागे महापालिकेचे 17 दुकान गाळे आहेत. हे गाळे खाली करण्यासाठी प्रशासकांनी नोटिसा बजावल्या होत्या. 14 भाडेकरूंनी दुकान गाळे महापालिकेच्या ताब्यात दिले; मात्र तीन भाडेकरूंनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती. तेथे महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्यानंतर संबंधितांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार सर्किट बेंचमध्ये सुनावणी सुरू होती.
अॅड. आडगुळे यांनी संबंधित भाडेकरूंचा करार 1974 मध्ये संपला आहे. तसेच नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू असून तेथे नागरिकांना सुविधा देणे आवश्यक आहे. त्यासाठी जागेचा ताबा मिळणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद केला. दरम्यान, सर्किट बेंचने याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी चार आठवडे ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचेही आदेश दिले.