

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्याकडे जात असतानाच या नाट्यगृहासाठी बाह्यव्यवस्थापकाची (आऊटसोर्सिंग) नियुक्ती करावी, असा प्रस्ताव इस्टेट विभागाच्या वतीने तयार केला आहे. महापालिकेच्या २० जुलै रोजी होणाऱ्या महासभेत हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. महासभेत मंजुरी मिळाल्यास पुढील कार्यवाही होईल. दरम्यान, या प्रस्तावामुळे नाट्यगृहाचे खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याची चर्चा सांस्कृतिक वर्तुळात सुरू आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कलासक्त दूरदृष्टीतून साकारलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला शतकोत्तर परंपरा आहे. सध्या हे नाट्यगृह महापालिकेच्या अखत्यारीत आहे. दरम्यान ८ ऑगस्ट २०२४ रोजी आग लागल्याने नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू असून सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी बांधकाम पूर्ण करून नाट्यगृह खुले करण्याचे नियोजन आहे. एकीकडे नाट्यगृह पुनर्बांधणी कामाबाबत आढावा बैठका सुरू असताना नाट्यगृहासाठी बाह्यव्यवस्थापन नेमण्याच्या प्रस्तावामुळे खाजगीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
प्रशासन व रंगकर्मी काय म्हणताहेत?
नाट्यगृहाचा देखभाल खर्च व मिळणारे उत्पन्न यातील आर्थिक फरक साधारणपणे ५० लाख आहे. ही आर्थिक दरी भरून काढणे महापालिका प्रशासनासमोरील आव्हान आहे. त्यामुळे नाट्यगृहाचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे दिल्यास कार्यक्षम व्यवस्थापन, देखभाल आणि आर्थिक शिस्त राखली जाईल असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र भाडेवाढ, उपलब्धता, सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य आणि सार्वजनिक स्वरूप कायम राहणार का, असा प्रश्न सांस्कृतिक संस्था, नाट्यसंस्था आणि रंगकर्मी यांच्याकडून उपस्थित होत आहे.
महासभेतील निर्णयावरच मदार
२० जुलै रोजी होणाऱ्या महापालिकेच्या महासभेतील निर्णयावरच सर्व मदार आहे. या प्रस्तावातून केवळ व्यवस्थापनात बदल होणार की भविष्यात खाजगीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले जाणार, याचे चित्र महासभेनंतर स्पष्ट होणार आहे.