

आशिष ल. पाटील
गुडाळ : ‘गोकुळ’च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महत्त्वाचा टप्पा असलेल्या ठराव प्रक्रियेचा जिल्हाभर उडालेला धुरळा खाली बसण्यापूर्वीच आता ‘केडीसीसी’ बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचीही ठराव प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होत आहे. ‘गोकुळ’ पाठोपाठ ‘केडीसीसी’च्या ठराव प्रक्रियेमुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे राजकारण पुन्हा ढवळून जाणार आहे.
‘केडीसीसी’ बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत पाच जानेवारी २०२७ रोजी संपत असून, त्यापूर्वी काही महिने आधी ठराव प्रक्रिया राबवावी लागणार आहे. बँकेने नुकतेच संचालक मंडळाची मुदत संपत असल्याचे पत्र सहनिबंधक सहकारी संस्था यांना पाठवले असून, ऑगस्ट महिन्यात ही प्रक्रिया राबविण्याचे सहकार विभागाचे नियोजन आहे. यापूर्वी २०२२ मध्ये झालेल्या बँकेच्या निवडणुकीत संचालक पदाच्या २१ जागा होत्या.
आगामी निवडणुकीत ही संख्या २५ होणार आहे. त्यामध्ये बारा तालुक्यातील विकास संस्था गटातील १२ जागा, साखर कारखाने, सूतगिरण्या, तालुका संघ गटात २ जागा, शेतीमाल प्रक्रिया, प्राथमिक यंत्रमाग संस्था गटात १ जागा, नागरी बँका, पतसंस्था गटात १ जागा, दूध संस्था, वराह पालन संस्था शेळी-मेंढी संस्था गटात २ जागा, पाणीपुरवठा, ग्राहक, गृहनिर्माण, औद्योगिक आणि व्यक्ती सभासद गटात २ जागा, महिला राखीव २ जागा, अनुसूचित जाती-जमाती १ जागा, इतर मागासवर्गीय १ जागा, विमुक्त भटक्या जाती-जमाती १ जागा अशा २५ जागा होणार आहेत.
‘गोकुळ’च्या संस्था वाचविण्यामागे बँकेच्या निवडणुकीची किनार
बँकेच्या संचालक मंडळात दूध संस्था गट स्वतंत्र होऊन या गटात दोन जागा दिल्या आहेत. दूध संस्थांना एकूण सात मते देण्याचा अधिकार आहे. ‘गोकुळ’च्या संलग्न दूध संस्था बँकेच्या ही मतदार आहेत. ‘गोकुळ’ मधील अवसायनातील संस्था रद्द झाल्यास बँकेच्या मतदार यादीतून ही त्या बाहेर पडणार आहेत. ‘गोकुळ’च्या अवसायनातील संस्था वाचविण्यामागे बँकेच्या निवडणुकीचीही किनार आहे. त्यामुळे ‘गोकुळ’ निवडणुकीमधील आघाड्या जिल्हा बँक निवडणुकीत ही कायम राहण्याची शक्यता आहे.
10 संचालकांचे वारस की...?
दरम्यान, ‘केडीसीसी’चे विद्यमान अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह तब्बल 10 संचालक रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्बंधामुळे बँकेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरत असून, बँकेत आता त्यांच्या ठिकाणी नवे चेहरे येणार की, अपात्र संचालकांचे वारसच पुन्हा बँकेत येणार हेही आगामी निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.