

कोल्हापूर : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे पवित्र पोर्टलद्वारे शंभर टक्के भरण्यासाठी शासनस्तरावर ठोस पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी दिली.
सोलापूर येथील प्रचार दौऱ्यात त्यांनी विविध शाळा व शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांशी संवाद साधला. राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे; मात्र भरतीतील विलंबामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे दीर्घकाळ रिक्त राहत आहेत. २०१७ मध्ये सुरू झालेली शिक्षक भरती प्रक्रिया २०२२ मध्ये पूर्ण झाली. २०२२ मधील भरती प्रक्रिया अद्याप सुरू असल्याने भरतीतील अनियमिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिक्षकांची नियमित निवृत्ती व रिक्त पदांमुळे उपलब्ध शिक्षकांवरील अध्यापनाचा भार वाढत आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आहे. शिक्षक भरतीतील विलंब दूर करून शाळांना वेळेत शिक्षक उपलब्ध करणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही गावडे यांनी स्पष्ट केले.
मंजूर रिक्त पदे शंभर टक्के भरण्यासाठी प्रयत्न
शिक्षक भरती ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित महत्त्वाची बाब आहे. पात्र शिक्षक उपलब्ध होण्यासाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) दरवर्षी नियमितपणे घेण्यात यावी. तसेच, पवित्र पोर्टलवरील भरती निश्चित वेळापत्रकानुसार पूर्ण करून मंजूर रिक्त पदे शंभर टक्के भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गावडे म्हणाले.