

राधानगरी : राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील मंडलाधिकारी कुलदीप शिवराम जनवाडे (47) यांना शेतजमिनीच्या सातबारा पत्रकी नाव नोंद करण्यासाठी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी पकडले.
तक्रारदार यांनी 19 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार अर्जुनवाडा येथील शेतजमीन गट क्रमांक 479 मध्ये सातबारा पत्रकी नाव नोंद करण्यासाठी कसबा वाळवे मंडल कार्यालयात गेल्यानंतर मंडलाधिकारी कुलदीप जनवाडे यांनी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 19 व 20 डिसेंबर रोजी तक्रारीची पडताळणी केली. या पडताळणीत मंडलाधिकारी यांनी सातबारा नोंदणीच्या प्रकरणासाठी 7 हजार रुपये तसेच तक्रारदाराच्या गावातील इतर चार प्रकरणांसाठी एकूण 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी सापळा रचण्यात आला. पडताळणीदरम्यान जनवाडे यांनी तक्रारदाराकडून एकूण 27 हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
याप्रकरणी आरोपी कुलदीप जनवाडे यांच्याविरुद्ध राधानगरी पोलिस ठाणे, जिल्हा कोल्हापूर येथे भष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या घरावर छापाही टाकण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक उज्वला भडकमकर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील करत आहेत.