

कसबा बावडा : अज्ञात वाहनाच्या धडकेत डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या आंबेडकर नगर कसबा बावडा येथील महिला राधाबाई आत्माराम कांबळे (वय ४८) यांचा मृत्यू झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राधाबाई कांबळे या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाजूने जिल्हा व सत्र न्यायालय समोरून कसबा बावडाकडे जात होत्या. रस्त्यावरून जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी जवळच असलेल्या सेवा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
राधाबाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, आई, भाऊ असा परिवार आहे. रात्री उशिरा याबाबत पोलिसांत नोंद झाली.