

कसबा बावडा : गेली पाच-सहा दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी सायंकाळी 7 वा. राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी 41.05 फुट होती. बुधवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून कसबा बावडा-शिये रस्त्यावर तस्ते ओढा येथे पुराचे पाणी आल्याने पाण्यातूनच वाहतूक सुरू होती. रात्री रस्त्यावर आलेल्या पाण्याची पाहणी करून गरज पडल्यास वाहतूक बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.
गेले तीन दिवस पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दत्त मंदिर परिसरातील पंचगंगा घाटावर महिला नागरिकांची पूर पाहण्यासाठी गर्दी होत आहे. राजाराम बंधारा येथे पाटबंधारे विभाग, शाहूपुरी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी तैनात आहेत. प्रत्येक तासाला पाणी पातळी संदर्भात अपडेट दिली जात आहे.
मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास पंचगंगेने 39 फूट ही इशारा पातळी ओलांडल्यानंतर कसबा बावडा येथील रेणुका मंदिर नजीकच्या 12 मीटर रस्त्यावर पाणी आले. शेतकर्यांसाठी हा जवळचा रस्ता पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. दरम्यान पंचगंगेची पाणीपातळी धोका पातळीकडे जात असताना कसबा बावडा-शिये दरम्यान रहदारीच्या मुख्य मार्गावर बुधवारी सायंकाळी पुराचे पाणी आले. दिवसभरात पाणीपातळीत वाढ होत राहिली, रस्त्याच्या मध्यावर सायंकाळी सातच्या सुमारास सुमारे एक फूट पाणी होते. यातून सर्व प्रकारची वाहतूक सुरू होती.