

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी शहरातील 593 मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान झाले. महापालिकेसाठी 66.54 टक्के मतदान झाले. कसबा बावड्यातील प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वाधिक 76.81 टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान प्रभाग क्रमांक 15 मध्ये 60.69 टक्के झाले.
प्रभाग क्र. 1 मध्ये सकाळपासूनच उमेदवारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. यामध्ये महिलांची संख्या तुलनेने अधिक होती. प्रभाग क्रमांक 2 मधील भोसलेवाडी, कदमवाडी, जाधववाडी, मार्केट यार्ड, बापट कॅम्प परिसरात चुरशीने मतदान झाले. मतदान केंद्रासह उमेदवारांच्या बूथवरही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. प्रभाग क्रमांक 3 मधील ठोंबरे गल्ली, कसबा बावडापासून लाईन बाजार, चार नंबर फाटक, रमणमळा, हिम्मतबहाद्दर परिसर, एसटी कॉलनी, वारणा कॉलनी, ताराबाई पार्क, न्यू पॅलेस परिसरात दिवसभर मतदानाचा उत्साह दिसून येत होता.
प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्वच मतदान केंद्रांवर तणावपूर्ण वातावरणात अक्षरशः ईर्ष्येने मतदान झाले. सदर बाजार, विचारे माळ, कनाननगर येथील मतदान केंद्रावर दुपारी चारनंतर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या. सायंकाळी 5.30 वाजता बाहेरील गेट बंद करण्यात आले. सदर बाजारमधील कोरगावकर हायस्कूलमध्ये सायंकाळी 5.30 वाजता मतदान केंद्रात सुमारे चारशेहून जास्त मतदार होते. परिणामी सायंकाळी 6.45 पर्यंत याठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू राहील. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पांढर्या टोप्या तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. एकमेकांचे कट्टर विरोधक कार्यकर्ते आमने-सामने येत होते. त्यामुळे वारंवार तणावाची स्थिती निर्माण होत होती. अनेकवेळा कार्यकर्ते पोलिसांशी हुज्जत घालत होते. त्यामुळे शाब्दिक वादावादी होत होती. प्रभाग क्रमांक 5 मध्ये काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट-भाजप यांच्यात प्रामुख्याने लढत होती. यामुळे सकाळपासून या परिसरातील केंद्रावर मतदानासाठी गर्दी झाली होती.
प्रभाग सहा, सात व आठमधील बहुतांशी केंद्रावर मशिन बंद पडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. ताराबाई रोडवरील धर्मशाळेतील मतदान केंद्रावरील मशिन तर सुमारे दीड तास बंद पडले होते. साडेआठ वाजण्याच्या सुमारास हे मशिन बंद पडले. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते सुरू झाले. त्यामुळे पुढे ही वेळ वाढवून देण्यात आली. वांगी बोळ तसेच लक्षतीर्थ वसाहतमधील यशवंतराव चव्हाण विद्यामंदिरमध्ये देखील मशिन बंद पडण्याचे प्रकार घडले. लक्षतीर्थ परिसरातील प्रबुद्ध भारत हायस्कूल मतदान केंद्र व महात्मा फुले शाळा केंद्र येथील ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे काही काळ प्रक्रियेत खंड पडला, मात्र तातडीने मशिन बदलण्यात आले.
हाय व्होल्टेज लढत असलेल्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये सकाळपासूनच मतदानासाठी मतदार गर्दी करत होते. फुलेवाडी रिंग रोड, फुलेवाडी रंकाळा परिसरची एक बाजू, राजोपाध्ये नगर परिसर, हरिओम रोटरी विद्यालय, गुरुदेव विद्यालय या केंद्रावर दुपारनंतर गर्दी वाढत गेली. पानसरे विद्यामंदिर येथेही दुपारपर्यंत मोठी रांग लागली होती. प्रभाग दहामध्ये मतदानासाठी दिवसभर काही मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे चित्र होते. शेवटच्या तासापर्यंत मतदार बाहेर काढणारी कार्यकर्त्यांची फळी, मातब्बर घराण्यांनी दिलेला प्रत्येक बूथवरील खडा पहारा आणि शहराचा मध्यवर्ती भाग आणि जोडलेला उपनगराचा परिसर यामुळे उमेदवारांची चाललेली धावपळ अशी चुरस या प्रभागात दिवसभर होती. प्रभाग क्रमांक 11 मध्ये मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. मात्र चटके बसणार्या उन्हामुळे 11 वाजल्यापासून मतदारांचा वेग मंदावला. यामुळे अनेक मतदान केंद्रांमध्ये केवळ दोन-चार मतदार दिसत होते. सायंकाळी 4 नंतर मतदारांनी पुन्हा मतदान केंद्रांमध्ये गर्दी केली. प्रभाग क्रमांक 12 मध्ये मिरजकर तिकटी, कोळेकर तिकटी, देवल क्लब, बिंदू चौक ते दसरा चौक, सीपीआर चौक ते भवानी मंडपच्या पूर्व बाजूचा परिसरात अगदी सकाळपासूनच या मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. प्रभाग क्रमांक 13 मधील मंडलिक वसाहत, यल्लम्मा मंदिर ते सुभाषनगर, जवाहनगर, बेलबाग परिसरात मोठ्या चुरशीने मतदानासाठी लोक येत होते. प्रभाग क्रमांक 14 मध्ये यादवनगर, शिवाजी उद्यमनगर, शाहू स्टेडियम परिसर, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसमोरचा भाग, आझाद चौक, रविवार पेठ, शाहूपुरी, बागल चौक आदी भागात उत्साह होता. ठिकठिकाणी मतदान केंद्रासमोर सकाळपासूनच गर्दी होत होती. प्रभाग क्रमांक 15 मध्ये सर्वात कमी मतदान झाले. अनेक ठिकाणी सकाळपासूनच संथ गतीने मतदान सुरू होते. मात्र सायंकाळी मतदानाची गती वाढली. प्रभाग क्रमांक 16 मध्ये दौलतनगर, भाऊसाहेब जगदाळे शाळेतील मतदान केंद्रांवर सायंकाळनंतरही मतदार रांगेत होते. प्रभाग क्रमांक 17 मध्ये टेंबलाईवाडी विद्यालयात दहा मतदान केंद्रे होते. यामुळे दिवसभर या परिसरात गर्दी होती. राजेंद्र नगरातील मतदान केंद्रांवर मतदारांची दिवसभर गर्दी होती. बड्स इंटरनॅशनल स्कूलच्या मतदान केंद्रांत सायंकाळनंतरही साडेतीनशे मतदार रांगेत होते.
प्रभाग क्रमांक 18 मधील एका केंद्रात मतदानाची वेळ संपल्यानंतर केंद्राचा मुख्य दरवाजा बंद करून 33 मतदारांना चिठ्ठ्या देण्यात आल्या. प्रभाग क्र. 19 मध्ये अत्यंत चुरस व ईर्ष्येच्या वातावरणात मतदान पार पडले. मतदान केंद्र न सापडणे, ईव्हीएम मशिनचे बटण बंद पडणे, बूथ उभारण्यावरून पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीच्या घटना घडल्या. मतदान संपण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तपोवन केंद्रावर मतदाराच्या रांगा पाहायला मिळाल्या. प्रभाग क्रमांक 20 मध्ये सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली होती तर दुपारचे टप्प्यात मतदान केंद्रावर शुकशुकाट जाणवत होता. चार वाजल्यानंतर परत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या.
मतदानासाठी ती इटलीतून कोल्हापुरात
सध्या नोकरीनिमित्त लिवोर्नो (इटली) येथे वास्तव्यास असलेल्या प्रियांका राजन सावंत यांनी केवळ मतदानासाठी कोल्हापुरात येऊन आपला हक्क बजावला. प्रभाग क्रमांक 20 मधील साळोखेनगर येथील राजे संभाजी विद्यालय या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
अनेकांना मतदान करता आले नाही
उमेदवारांनी मतदारांना बाहेर काढत मतदान केंद्रापर्यंत पोहोचविले. यामुळे 4 ते 6 यावेळेत मतदान केंद्र परिसरात मोठी गर्दी झाली होती. साडेपाच वाजता मतदान केंद्राची मुख्य प्रवेशद्वारे बंद केली. अनेकांना मतदान करता आले नाही.