

सांगरूळ : करवीर विधानसभा मतदार संघातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा विजय हीच स्व. आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला अन्याय भरून काढूया, असेही ते म्हणाले. स्वयंभूवाडी (ता. करवीर) येथे करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा प्रचार शुभारंभात ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, स्व. पी. एन. पाटील यांच्या पश्चात राहुल पाटील व राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण राष्ट्रवादीमध्ये आलेले आहात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आम्ही सर्वजणच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. राहुल पाटील यांना आमदार केल्याशिवाय गप्प राहणार नाही. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. निवडणुकीतून माघार घेणाऱ्यांनाही न्याय देऊ. लाडक्या बहिणींना दरमहा रु. 2100 देऊ.
राहुल पाटील-सडोलीकर म्हणाले, या परिसरातील वाड्या- वस्त्यांपासून गावागावांपर्यंत विकासामध्ये पी. एन. पाटील यांचे योगदान आहे. त्यांच्या जाण्यानंतर ही जनता माझ्याही पाठीशी भरभक्कमपणे उभी राहिली. यापुढेही या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभी राहील.
सांगरूळ जि.प. मतदार संघातील उमेदवार सौ. रेखाताई प्रकाश मुगडे, सांगरूळ पंचायत समिती मतदारसंघ उमेदवार सौ. मेघा आनंदराव नाळे व बहिरेश्वर पंचायत समिती मतदारसंघ उमेदवार सौ. लता सूर्यकांत दिंडे यांचीही भाषणे झाली. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावतीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, शंकरराव पाटील, महेश पाटील, संतोष पोर्लेकर, शिवाजीराव देसाई, सौ. सुशीलाताई पाटील, कृष्णात चाबूक, सचिन पाटील, शामराव सूर्यवंशी, सुभाष सातपुते, प्रकाश पाटील, डॉ. सुरेश मोरे, विलास पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
पी. एन. पाटील यांना शेतकऱ्यांची आस्था, प्रेम
मुश्रीफ म्हणाले, आज पी. एन. पाटील यांची आठवण तीवतेने येते. ते केडीसीसीचे संचालक झाले, त्याचवेळी मीही संचालक झालो. त्यांना शेतकऱ्यांबद्दल प्रचंड आस्था आणि प्रेम होते. राहुल पाटील यांचा उल्लेख ‘आपल्या सर्वांचे नेते आणि भावी आमदार’ असा करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.