

कोल्हापूर : कर्णसिंह गायकवाड, अजित नरके, प्रा. किसन चौगले, नाविद मुश्रीफ यांची नावे गोकुळच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच हवा या अरुण डोंगळे यांनी घेतलेल्या भूमिकेने गोकुळच्या सत्ताधारी नेत्यांनी महायुतीतील घटक पक्षाचा चेहरा अध्यक्षपदासाठी देण्याचे ठरविले आहे. त्यातून या तीन नावांची चर्चा सुरू आहे.
शुक्रवार, दि. 16 रोजी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गोकुळमधील सत्ताधारी गटाची बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. राज्यातील नेत्यांनी गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा हवा, अशी भूमिका घेतली आहे, असे डोंगळे यांनी म्हटले आहे. त्याला अनुसरून महायुतीतील घटक पक्ष असलेले आ. विनय कोरे यांच्या गटाचे कर्णसिंह गायकवाड, आ. चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके, हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ आणि मुश्रीफ व के. पी. पाटील यांचे निकटवर्ती प्रा. किसन चौगले यांची नावे पुढे आली आहेत.
विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष, शिवसेना शिंदे गटाचे आ. चंद्रदीप नरके आणि अजित पवार राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ व संभाव्य प्रवेश करणारे के. पी. पाटील हे प्रतिनिधित्व करीत असलेले पक्ष महायुतीतील घटक आहेत. हा नवा फॉर्म्युला पुढे आणून डोंगळे यांचा डाव त्यांच्यावरच उलटविण्याची पुरती तयारी नेत्यांनी केल्याची चर्चा आहे. गोकुळमधील सत्ता कायम राखण्यासाठी या नेत्यांना आमदार सतेज पाटील यांची समजूत काढावी लागणार आहे.