

सुनील कदम
कोल्हापूर : कर्नाटकच्या राज्यकर्त्यांनी पुन्हा एकदा अलमट्टी धरणाच्या उंची वाढीचा राग आळवायला सुरुवात केली आहे. इथल्या महापुराशी त्यांना कोणतेही देणे-घेणे असलेले दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनानेही याबाबतीत ठाम भूमिका घेण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.
अलमट्टी धरण भरले की त्याच्या बॅकवॉटरमुळे इथे महापूर येतो, हेही सिद्ध झालेले आहे. त्यात आता हिप्परगीच्या बॅकवॉटरची भर पडलेली आहे. अनेक जलतज्ज्ञ, काही शासकीय व खासगी समित्या आणि जागतिक संशोधन संस्थांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे; पण कर्नाटकी राज्यकर्ते नेहमीप्रमाणे ते मानायला तयार नाहीत.
महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान 2019 साली एक करार झाला होता. त्यानुसार 15 ऑगस्टपूर्वी कर्नाटकने अलमट्टीतील पाणीसाठा 517 मीटरपेक्षा खाली ठेवायचा होता; पण कर्नाटकने हा करार कधीही पाळलेला नाही. 2021 आणि 2023 सालच्या महापुरात याचा प्रत्यय आलेला आहे. त्यावर्षी कर्नाटकने जून-जुलैमध्येच अलमट्टी धरण पूर्ण भरून घेतले होते. परिणामी, कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या नाकातोंडात महापुराचे पाणी चालल्यानंतर कर्नाटकने अलमट्टीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आणि इथला महापूर ओसरला.
यंदा मे महिन्यातच वळवाच्या पावसाने तुफान हजेरी लावली. तशातच मान्सूनही वेळेपूर्वीच दाखल झाला आणि तुफानी पावसाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे करार बासनात गुंडाळून कर्नाटकने जूनमध्येच अलमट्टीत 110 टीएमसीहून अधिक आणि 519 मिटरहून अधिक पाणीसाठा केला होता. त्यानंतर 19 ऑगस्टपासून सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि दोन दिवसातच पंचगंगा, वारणा आणि कृष्णा नद्यांनी धोक्याची पातळी गाठली. त्यानंतर घाईगडबडीने अलमट्टीतून दोन, अडीच, तीन लाख क्यूसेकने विसर्ग सुरू केल्यानंतर इथली पाणीपातळी ओसरली, अन्यथा यंदाही महापूर अटळ होता.
महाराष्ट्र-कर्नाटकने महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 2019 साली केलेला करार कर्नाटक शासन कधीही पाळत नाही. कारण हा करार कायदेशीर किंवा लिखीत स्वरूपात नाही. त्यामुळे केंद्रीय जल आयोगाने आता याबाबत पुढाकार घेऊन या कराराला कायदेशीर स्वरूप देण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे हा करार पाळण्यासाठी कर्नाटकवर कायदेशीर बंधन लादण्याचीही गरज आहे; तरच महापुराचा धोका कायमस्वरूपी ठळेल.
2005, 2019, 2021 आणि 2023 मध्ये महापुराचा तडाखा.
अलमट्टी व हिप्परगी बॅकवॉटरमुळे पूरस्थिती गंभीर.
शासकीय समित्या, तज्ज्ञ व जागतिक संस्था यांचे पुरावे उपलब्ध.
2019 मध्ये ठरलेला करार : 15 ऑगस्टपूर्वी अलमट्टीचा पाणीसाठा 517 मीटरखाली ठेवायचा.
कर्नाटकने हा करार कधीही पाळला नाही.
2021 व 2023 मध्ये जून-जुलैमध्येच धरण पूर्ण भरले. त्यानंतर मोठ्या विसर्गामुळे महापूर ओसरला; पण जनजीवन विस्कळीत झाले.