Gutkha Mawa Ban | गुटखा-मावा विक्रेते, तस्करांचे धाबे दणाणले!

कर्नाटकने दिले गुटखाबंदीचे संकेत : गोवा, कर्नाटक, गुजरातमधून ‘चोरीछुपे’ होते आवक
Gutkha Mawa Ban |
Gutkha Mawa Ban | गुटखा-मावा विक्रेते, तस्करांचे धाबे दणाणले!
Published on
Updated on

सुनील कदम

कोल्हापूर : अन्न-औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत; तर दुसरीकडे महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक सरकारनेही राज्यात गुटखा आणि सुगंधी तंबाखूवर बंदी लादण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे प्रामुख्याने सीमाभागातील गुटखा तस्कर आणि विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

गुटखाबंदी कागदावरच!

राज्यात २० जुलै २०१२ रोजी गुटखा, सुगंधी तंबाखू आणि तंबाखूमिश्रित पानमसाल्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. पण प्रत्यक्षात ही गुटखाबंदी कागदावरच राहिलेली आहे. कारण राज्यातील बहुतांश पानटपऱ्या आणि अन्यत्र आजही कधी राजरोसपणे तर कधी ‘चोरीछुपे’ गुटखा विकला जातो. तसेच मावा बनविण्यासाठी लागणारी आणि राज्यात बंदी असलेली सुगंधी तंबाखूसुद्धा सर्वत्र खुलेआम मिळते.

कर्नाटक, गुजरातेतून आवक!

महाराष्ट्रात जरी गुटखाबंदी असली तरी शेजारच्या कर्नाटक आणि गुजरातमध्ये मात्र बंदी नाही. त्यामुळे राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यानंतर बहुतांश गुटखा उत्पादकांनी आपले गुटखा कारखाने कर्नाटक आणि गुजरातच्या सीमावर्ती भागात थाटले आहेत. कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, कलबुर्गी आणि बिदर या चार जिल्ह्यांतून गुटखा चोरीछुपे महाराष्ट्रात येतो. गुजरातमधील वलसाड, नवसारी आणि डांग या जिल्ह्यांतून महाराष्ट्रात गुटख्याचा रतीब घातला जातो. पोलिस आणि शासकीय यंत्रणेला इथल्या गुटख्याच्या चोरवाटांची खडान्‌खडा माहिती आहे. पण त्याकडे ‘अर्थपूर्ण कानाडोळा’ केला जातो.

करोडो रुपयांची उलाढाल!

राज्यात गुटखा आणि सुगंधी तंबाखू विक्रीवर बंदी असतानाही यातून होणारी उलाढाल ही डोळे दिपविणारी आहे. या व्यवसायातील जाणकारांच्या माहितीनुसार गुटखा आणि सुगंधी तंबाखूच्या तस्करीची उलाढाल महिन्याकाठी किमान ५०० कोटी रुपयांच्या घरात आहे. याचा अर्थ बंदी असूनही राज्यात वर्षाकाठी किमान ६००० कोटी रुपयांचा गुटखा आणि माव्यासाठी लागणाऱ्या तंबाखूची चोरीछुपे उलाढाल सुरूच आहे.

कर्नाटकचे स्वागतार्ह पाऊल!

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नुकतेच महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही गुटखा आणि सुगंधी तंबाखूवर बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. तसे झाले तर महाराष्ट्र व कर्नाटकातील गुटखा आणि माव्याच्या चोरवाटा बंद होतील. गुजरात सरकारनेही तसा निर्णय घेतला तर महाराष्ट्र-गुजरात सीमेवरीलही चोरवाटा बंद होतील आणि त्याचा परिणाम म्हणून आजवर केवळ कागदावर असलेली गुटखाबंदी खऱ्या अर्थाने साकार होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news