Kalammawadi Dam | चार वर्षांनंतर ‘काळम्मावाडी’ प्रथमच पूर्ण क्षमतेने भरले

काळम्मावाडी : येथे जवळपास पूर्ण पाणी संचय झालेले काळम्मावाडी धरण.
काळम्मावाडी : येथे जवळपास पूर्ण पाणी संचय झालेले काळम्मावाडी धरण. (छाया : मिलिंद कांबळे, राधानगरी)
Published on
Updated on

गुडाळ : धरणाच्या मुख्य संरक्षक भिंतीत असलेल्या गळतीमुळे २०२२ नंतर जाणीवपूर्वक पाणीसाठा कमी ठेवलेले काळम्मावाडी धरण चार वर्षांनंतर जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून, बुधवारी सकाळी दहा वाजता धरणात ९९.९० टक्के पाणीसाठा झाला आहे. विद्युत निर्मितीसाठी धरणातून १,२०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

आंतरराज्य प्रकल्प असलेल्या काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीला लागलेल्या गळतीमुळे २०२२ नंतर धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येत नव्हता. मात्र, यावर्षी गळती काढण्याचे काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाल्याने जलसंपदा विभागाने धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसंचय करण्याचा निर्णय घेतला होता. धरणाची पाणी साठवणूक क्षमता ६४६ मीटर आणि २५.३९ टीएमसी इतकी आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता पाणी पातळी ६४५.९८ मीटर आणि २५.३६ टीएमसी झाल्याने धरण ९९.९० टक्के भरले आहे.

गेली चार वर्षे धरणात पाणीसाठा अपूर्ण असल्याने उन्हाळ्यात लाभक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवत होती. शिवाय, धरणातून थेट पाईपलाईनने कोल्हापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा होत असलेला पुरवठाही या वर्षीच्या उन्हाळ्यात खंडित झाला होता. आता ‘काळम्मावाडी’ पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रात समावेश असलेल्या जिल्ह्यातील आणि कर्नाटकातील गावांच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनमार्फत उन्हाळ्यातही अखंडित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news