

अर्जुनवाडा : जिल्ह्याच्या हजारो शेतकर्यांच्या भवितव्याचा आधार असलेल्या काळम्मावाडी धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. मानवनिर्मित अनेक संकटांनी वेढलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे सरकार आणि जलसंपदा विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. धरण पूर्ण झाल्यापासून आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या सुरक्षा रक्षकांच्या जागी पुन्हा भरती केली नाही. धरणावर पोलिस बंदोबस्त नाही, जलसंपदा विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी मुख्य चौकीवर कायमस्वरूपी हजर नसतात, यामुळे धरणाची सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
काळम्मावाडी धरणाच्या मुख्य चौकीवर पोलिस कर्मचारी नाहीत किंवा जलसंपदा विभागाचे कर्मचारी नाहीत. खासगी नेमलेल्या सुरक्षा रक्षकांवर धरणाची सुरक्षा अवलंबून आहे. 27.40 टीएमसी क्षमतेच्या धरणात सध्या 22 टीएमसी पाणीसाठा असूनही या प्रकल्पाकडे जबाबदार अधिकार्यांचे दुर्लक्ष सुरू आहे. धरणाच्या संवेदनशील आणि धोक्याच्या ठिकाणी एकही नियुक्त जबाबदार कर्मचारी नाही, तर फक्त पाच सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या आधारावर संपूर्ण सुरक्षा उभी आहे.
धरणाच्या सुरक्षेसाठी स्थानिक पातळीवर अनेक बेरोजगार तरुण उपलब्ध असून, त्यांना नोकरी दिल्यास सुरक्षेसोबत त्यांना रोजगाराची संधीदेखील उपलब्ध होऊ शकते. धरण प्रकल्प कार्यान्वित होताना येथे साडेसहा हजार लोकसंख्या वास्तव्यास होती. रोजगार घटला, कर्मचारी निवृत्त झाले, सुविधांचा अभाव असल्याने आज त्या वसाहतीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. आता येथील लोकसंख्या नाममात्र उरली आहे. धरणाजवळ पूर्णपणे सुरक्षा यंत्रणा नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
बॅकवॉटरजवळ ओल्या पार्ट्या
धरणाच्या बॅकवॉटरजवळ ओल्या पार्ट्या सर्रास घडत आहेत. पार्ट्या झाल्यानंतर पडलेला कचरा आणि दारूच्या बाटल्या तिथेच टाकल्या जातात. याकडे कुणाचेच लक्ष नाही. कुणीही कधीही यावे, धरणाच्या बाजूच्या मार्गाने कसेही घुसावे, पार्ट्या करावे आणि निघून जावे. अशीच येथील परिस्थिती आहे.