

कोल्हापूर : काळम्मावाडी योजनेच्या देखभाल आणि दुरुस्तीमुळे सोमवारी व मंगळवारी शहरातील नियमित नळाद्वारे पाणीपुरवठा बंद राहिला. मंगळवारी पाण्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागली. मिळेल त्या कूपनलिकेवरचे पाणी भरणे किंवा महापालिकेने पाठविलेल्या टँकरवर पाणी भरण्यासाठी गर्दी झाली होती. महापालिकेने मंगळवारी 21 टँकरद्वारे एकूण 62 फेर्यांत विविध भागांमध्ये तात्पुरता पाणीपुरवठा करण्यात आला.
महापालिकेच्या 4 आणि खासगी 17 टँकरांचा वापर करून प्रामुख्याने ए, बी आणि ई वॉर्डांमधील मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, सुभाषनगर, योगेश्वरी कॉलनी, उद्यमनगर, राजलक्ष्मीनगर, साने गुरुजी वसाहत, शिवगंगा कॉलनी, राजेंद्रनगर, निंबाळकर चौक, कोरगावकर कंपाऊंड, कदमवाडी, कसबा बावडा, बापट कॅम्प आदी परिसरांमध्ये पाणीपुरवठा करण्यात आला. महापालिकेच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीपर्यंत काळम्मावाडी योजनेचे देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण होईल व त्याच रात्रीपासून योजनेतून पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. परिणामी, बुधवारी कमी दाबाने आणि गुरुवारपासून नियमित पद्धतीने शहराला पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद असल्याने या काळात अन्य देखभाल दुरुस्तीची कामेही करण्यात आली. राजेंद्रनगर व कळंबा फिल्टर हाऊसजवळील खराब वॉल्व्ह आज बदलण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.