

सुनील सकटे
कोल्हापूर : काळम्मावाडी धरण दुरुस्तीस निधी उपलब्ध असूनही वर्षभरात केवळ २५ ते ३० टक्केच काम झाले. पाण्यामुळे फौंडेशनच्या खाली असणारी ४० टक्के गळती काढण्याचे शिवधनुष्य कसे पेलणार? सोमवारी धरणातील पाण्याची पातळी ६११ मीटरवर असल्याने फौंडेशनच्या खाली असणारी गळती काढण्याचे जलसंपदासमोर आव्हान आहे. गेल्यावर्षी राज्य शासनाने धरण दुरुस्तीसाठी ८० कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली, तर ६२ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली.
निविदा प्रक्रिया पूर्ण करून १३ जानेवारी २०२५ रोजी कामास सुरुवात झाली. मात्र, धरणातील पाण्यामुळे दुरुस्तीसाठी अडथळा येत असल्याचा जलसंपदाचा दावा आहे. वर्षभरात केवळ १३ कोटी रुपयांचे काम झाल्याचे सांगण्यात येते; पण अनेक महिने काम ठप्प आहे. यंदा धरणाची पातळी कमी झाल्याने इन्स्पेक्शन गॅलरीपर्यंत काम उरकण्याची धडपड सुरू आहे. केवळ ७० टक्के ग्राऊंटिंग पूर्ण झाले आहे.
धरणाच्या एक ते नऊ मोनोलिथमध्ये गळती आहे. मात्र, क्रमांक ५ आणि ७ मध्ये मोठ्या प्रमाणात गळती आहे. मोनोलिथ एक ते पाच आणि ८ व ९ मधील धरण माथा पातळी ते इन्स्पेक्शन गॅलरीच्या एक मीटरवर ग्राऊंटिंगचे काम पूर्ण झाले आहे. जास्त खोलीचे आणि ५ व ७ मधील धरण माथा पातळी ते इन्स्पेक्शन गॅलरीच्या एक मीटरवर ग्राऊंटिंगचे काम झाले नाही. इन्स्पेक्शन गॅलरी ते फाैंडेशन गॅलरीपर्यंतचे ग्राऊंटिंगचे कामही अपूर्ण आहे. ५, ६ आणि ७ मधील ग्राऊंटिंगचे काम अद्याप अपूर्ण आहे. काम वेळेत पूर्ण होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
तीन अधिकारी, तरीही गळतीचे काम रेंगाळलेच
तीन अधिकारी झाले, तरी काम रेंगाळलेच आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता विनया बदामी यांनी निविदा प्रक्रिया केली, अशोक पोवार यांनी प्रत्यक्ष काम सुरू केले. आता अनिकेत सावंत गळती काढण्याचे काम पूर्णत्वास नेणार का, असा सवाल होत आहे.