

कोल्हापूर : देश-विदेशासह कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पुण्यासह राज्यातील कुख्यात तस्कर आणि संघटित गुन्हेगार बंदिस्त असलेल्या कळंबा कारागृहाची सुरक्षा यंत्रणा अभेद्य करण्यात आली आहे. 2 हजार 48 कैदी बंदिस्त असलेल्या कारागृहात 616 सीसीटीव्ही कॅमेर्यांची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. सर्कलशिवाय कारागृहांतर्गत 50 प्रवेशद्वारांवर थंबसह अलार्म सिस्टीम बसविण्यात आली आहे. कैद्यामधील वादविवाद, जीवघेणी हल्ल्यासह अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास क्षणार्धात त्याची खबर नियंत्रण कक्षाला मिळते अन् यंत्रणा अलर्ट होणार आहे.
मुंबई-पुण्यापाठोपाठ कळंबा कारागृहांतर्गत यंत्रणा सक्षम आणि मजबूत करण्यात आली आहे. एकेकाळी मुंबई, पुण्यापाठोपाठ कळंबा कारागृहाची सुरक्षा यंत्रणा अभेद्य मानली जात. कारागृहाचा राज्यात लौकिक असताना चार-पाच वर्षांच्या काळात ढिसाळ व भोंगळ नियोजनामुळे कारागृहाची राज्यात पुरेपूर बेअदबी झाली आहे. गांजासह अमली पदार्थ तस्करीमुळे तर कारागृह व्यवस्थापन ब्लॅकलिस्टवर आले होते. कैद्यामधील अंतर्गत वाद, त्यातून झालेला खून, खुनी हल्ल्यामुळे कळंबा कारागृह बहुचर्चित ठरले होते. त्यातच कारागृहातील एक अधिकारी अमली पदार्थ तस्करीप्रकरणी रंगेहाथ जेरबंद झाल्याने कारागृह व्यवस्थापन वादाच्या भोवर्यात सापडले होते.
कारागृहाचा परिसर 100 एकरांत असला तरी प्रत्यक्षात 25 एकर क्षेत्रात भक्कम तटबंदी आहेत. 1 हजार 660 क्षमता असलेल्या कारागृहात सद्यस्थितीत 2 हजार 48 कैदी बंदिस्त आहेत. त्यात 60 महिला कैद्यांचा समावेश आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, मुबंई, पुण्यासह मराठवाडा, विदर्भासह देश, विदेशांतील कैद्यांचा समावेश आहे. कारागृह म्हणजे गुन्हेगारी वर्तुळातील नव्या-जुन्या समाजकंटकांची चालती-बोलती शाळाच... इथे गुन्हेगारीचं प्रशिक्षण अन् प्रात्यक्षिकही अनुभवाला येतं...
खतरनाक गुन्हेगारांची भरमसाट वाढणारी गर्दी आणि अत्यल्प मनुष्यबळामुळे कारागृहाची यंत्रणा अक्षरश: तोकडी असली तरी दीड- दोन वर्षांत कळंबा कारागृहातील गैरप्रकारांना आळा बसल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्य सरकारने कळंबा कारागृहाच्या सुधारणांकडे विशेष लक्ष केंद्रित करून या काळात कोट्यवधीच्या निधीची पूर्तता केली आहे.
सुमारे दोन कोटी खर्च करून कारागृहातील सर्वच सर्कल, महिला विभाग, सांस्कृतिक हॉल, योगसाधना, व्यायामशाळा, वाचनालय अशा महत्त्वाच्या 47 विभागांसह 616 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्यांची यंत्रणा नव्याने कार्यान्वित करण्यात आली आहे. कारागृहाचा कोपरा न कोपरा सीसीटिव्हीच्या नियंत्रणाखाली आणण्यात आला आहे.
कारावास भोगणार्या अथवा न्यायाधिन बंद्यांचा सगळीकडेच वावर असायचा, त्यावर आता निर्बंध आले आहेत. कारागृहांतर्गत 50 ठिकाणी प्रवेशद्वार करण्यात आले आहेत. थम आणि अलार्म सिस्टीम यंत्रणा बसविण्यात आली आहे. थम केल्याशिवाय कारागृहात अन्यत्र कोठेही फिरता येणार नाही. थमशिवाय प्रवेश केल्यास अलार्म प्रशासनाला सावध करतो, अशी नव्याने रचना करण्यात आली आहे.
कळंबा कारागृहातील पैनिक अलार्म सिस्टीम ही एक सुरक्षाप्रमाणी आहे. कर्मचार्यांसह कैद्यांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत व धोक्याची सूचना देण्यासाठी त्याचा वापर केला जातो. एखाद्या कैद्याने सुरक्षा रक्षकांवर हल्ला केल्यास अलार्मद्वारे लक्ष वेधले जाऊ शकते. कैद्यांमधील भांडण अथवा दंगल.. एव्हाना कैद्यामधील दोन गटांत गंभीर स्थिती उद्भवल्यास अलार्मद्वारे रक्षकांना सावध केले जाते. प्रशासनाला सिग्नल दिले जाते. कैद्याचा पलायनाचा प्रयत्न झाल्यास अलार्मद्वारे तातडीने प्रतिबंध कारवाई केली जाऊ शकते. मध्यवर्ती ठिकाणांसह वॉच टॉवर, महत्त्वाचे सेल, सुरक्षा रक्षकाशिवाय निवडक कैद्यांनाही प्रशिक्षण देऊन त्याच्याकडे उपकरण सोपविण्याचा अंतर्भाव आहे. केंद्रीय नियंत्रण कक्ष 24 तास अलर्ट ठेवण्यात आला आहे.