

कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथील मनोरमा कॉलनीत गॅस पाईपलाईन कनेक्शन जोडताना निष्काळजीपणा व हयगय करून तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 25 ऑगस्ट रोजी रात्री 10.25 वाजण्याच्या सुमारास गॅसचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत माय-लेकासह तिघांचा होरपळून मृत्यू झाला. तर, चिमुकली गंभीर जखमी आहे. या घटनेसंदर्भात 18 दिवसांनंतर जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
एच. पी. ऑईल गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कोल्हापूर विभागाचे प्रमुख गौरव गुणानंद भट (वय 34, रा. अश्विनी हौसिंग सोसायटी, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर, मूळ रा. अठूरवाला, डेहराडून, उत्तराखंड), इडिलिप्स इंजिनिअरिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे इंजिनिअर हरिष दादासाहेब नाईक (31, रा. पोखले, ता. पन्हाळा), सतीमाता कन्स्ट्रक्शन कंपनीचे कर्मचारी महम्मदहुजेर हबीबुररहमान हुजेरअली (रा. लकी बझारजवळ, राजारामपुरी, मूळ रा. माहेल्ला सराय, गुन्नौर, जि. संभल, उत्तर प्रदेश), सतीमाता कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रोप्रायटर अमोल टी. जाधव (रा. जनता वसाहत, साईबाबा मंदिर, पर्वती, पुणे) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल राजाराम पाटोळे यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
या स्फोटात शीतल अमर भोजणे (31), अनंत देवाजी भोजणे (60), प्रज्वल अमर भोजणे (6) यांचा मृत्यू झाला आहे. तर, ईशिका अमर भोजणे (3) ही जखमी असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. संपूर्ण जिल्ह्यात कोल्हापूर व इचलकरंजी असे दोन विभाग करण्यात आले आहेत. भट हे कोल्हापूर विभागाचे प्रमुख आहेत. एच. पी. ऑईल गॅस कंपनीअंतर्गत थर्ड पार्टी म्हणून इडिलिप्स इंजिनिअरिंग ग्लोबल प्रा. लिमिटेड कंपनी काम करत असून, कंपनीमार्फत प्रत्यक्षात काम करणार्या सतीमाता कन्स्ट्रक्शन कंपनीचे कर्मचारी यांच्यावर देखरेख ठेवून काम करून घेण्याची जबाबदारी आहे.
25 ऑगस्ट रोजी शितल भोजणे यांच्या घरी गॅस पाईपलाईन कनेक्शनचे प्रत्यक्ष काम सतीमाताकन्स्ट्रक्शन कंपनीचे कर्मचारी हुजेरअली यांनी केले. त्यांनी जोपर्यंत गॅस मीटर बसवले जात नाही, तोपर्यंत स्वयंपाकघरातील गॅस पाईपलाईनला एन्ड कॅप जोडणे बंधनकारक असतानाही एन्ड कॅप जोडली नाही. त्यामुळे गॅस गळती होऊन आग लागल्याने स्फोट झाला. त्यात तीन निष्पापांचा मृत्यू झाला, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले.