

कागल : जमिनीचा फाळणी नकाशा देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना कागल येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शासकीय दप्तरबंद शिवराम कृष्णा कोरवी (रा. हुपरी, ता. हातकणंगले) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
तक्रारदार हे त्यांच्या शेतजमिनीची मोजणी करून घेणार होते म्हणून त्यांनी त्यांच्या शेतजमिनीचे शेजारील गट नंबरचा फाळणी नकाशा आवश्यक असल्याने त्यांनी फाळणी नकाशा मिळावा म्हणून भूमी अभिलेख कार्यालय कागल येथे रीतसर अर्ज केला होता. अर्जाप्रमाणे तक्रारदाराने शिवराम कोरवी यांना भेटून त्यांच्याकडे फाळणी नकाशाची मागणी केली. त्यावेळी कोरवी यांनी तक्रारदार यांना त्यांच्या अर्जाप्रमाणे शेतजमिनीचा फाळणी नकाशा देण्यासाठी एक हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून त्यांच्याकडे लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सापळा रचून पंच साक्षीदारांच्या समक्ष तक्रारदार यांच्याकडून शिवराम कोरवी राहणार हुपरी, तालुका हातकणंगले यांनी एक हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस ‘लाचलुचपत’ पुण्याचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, हेड कॉन्स्टेबल संदीप काशीद, सचिन पाटील, कृष्णा पाटील यांनी केली.