

गारगोटी : दहा वर्षांत विकासाच्या नावाखाली बक्कळ पैसा कमविणार्या आ. प्रकाश आबिटकरांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघात करोडो रुपयांचा मोठा सिंचन घोटाळा केला असल्याचा घणाघात माजी आमदार के. पी. पाटील यांनी केला. कडगाव (ता. भुदरगड) येथील महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, भुदरगडच्या हरितक्रांतीचा पाया रचलेल्या माजी आमदार स्व. हरिभाऊ कडव यांनी भुदरगड तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या ज्या फये धरणाची उभारणी केली, त्या धरणाच्या दुरुस्तीसाठी आ. आबिटकरांनी दोन वर्षांपूर्वी 1 कोटी 92 लाख रुपये खर्च केले, तरीही या धरणाची गळती सुरूच आहे. कोल्हापूर पद्धतीचे निकृष्ट चार बंधारेही गळत आहेत. मेघोली धरण फुटून धोका निर्माण झाला आहे. काळम्मावाडी धरणाच्या गळती आणि कालव्यांच्या अस्तरीकरणासाठी टेंडर व निधी मंजूर होऊनही पार्टनरशिपसाठी यांनी कामे थांबविल्याची चर्चा आहे.
शिवसेनेचे उपनेते विजय देवणे म्हणाले, गद्दार आ. आबिटकरांनी प्रत्यक्षात पैशांचा सह्याद्री उभा केला आहे. मतदारसंघातील अनेक डोंगर विकत घेतले असून, जाऊ तेथे खाऊ ही त्यांची वृत्ती त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरेल. संदीप देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी धनाजीराव देसाई, राहुल देसाई, अॅड. दयानंद कांबळे, रणजित बागल आदींची भाषणे झाली. शामराव देसाई, विश्वजित जाधव, मधुकर देसाई, के. ना. पाटील, विलासराव कांबळे, काका देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सुभाष सोनार, बागुल देसाई, शिवाजीराव देसाई, काशिनाथ देसाई, एन. के. देसाई, बाळासाहेब भालेकर आदी उपस्थित होते. सभेपूर्वी पाटगाव, पाळ्याचा हुडा, म्हासरंग, वेसर्डे, नांदोली, शेळोली, मेघोली, करंबळी येथे प्रचार दौरा झाला.