

कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबा आणि यमाई मंदिरांचे मूळ सौंदर्य खुलणार आहे. जोतिबा मंदिर विकास आराखड्यातील कामांना येत्या दोन ते तीन आठवड्यांत सुरुवात होईल, त्याच्या पहिल्या टप्प्यात मंदिर संवर्धनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
श्रीक्षेत्र जोतिबाच्या मंदिर परिसर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील 259 कोटींच्या कामांना दि. 28 मे रोजी राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. त्यातील जोतिबा व यमाई मंदिर संवर्धन व दुरुस्तीची 81 कोटी 60 लाख रुपयांची कामे नियोजन विभागामार्फत करण्यात येणार आहेत, तर उर्वरित कामे संबंधित विभागाकडून केली जाणार आहेत. या कामांसाठी सल्लागाराची नियुक्ती प्रक्रिया झाली आहे.
पहिल्या टप्प्यात जोतिबा व यमाई मंदिर संवर्धनाचे काम केले जाणार आहे. याकरिता या दोन्ही मंदिरांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. यानंतर मंदिरांचे प्रत्यक्ष मोजमाप केले जाईल, त्यानुसार करण्यात येणारी कामे निश्चित केली जातील, त्यानुसार या कामांचा नेमका आराखडा तयार केला जाणार आहे. हे काम येत्या दोन ते तीन आठवड्यांत सुरू केले जाणार आहे.
या दोन्ही मंदिरांचे मूळ सौंदर्य खुले केले जाणार आहे. यामुळे ठिकठिकाणी बसवलेली फरशी, रंगकाम, सिमेंट आदी काढून टाकले जाणार आहे. कळसावरही वापरलेला अनावश्यक घटक काढून टाकत मंदिरांना मूळ रूपात खुलवले जाईल. याबरोबरच मंदिराचे वॉटर प्रूफिंग केले जाणार आहे. मंदिरात काही ठिकाणी गळती होते, ती ठिकाणे निश्चित करून त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती केली जाणार आहे.
जोतिबा व यमाई मंदिर संवर्धनासाठी 81 कोटी 60 लाखांचा निधी नियोजन विभाग देणार आहे. मात्र, उर्वरित कामांसाठीचाही निधी नियोजन विभागातूनच मिळावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे. यामुळे हा निधी उपलब्ध होताच, येत्या दोन वर्षांत पहिल्या टप्प्यातील सर्व कामे पूर्णत्वास जातील, अशी शक्यता आहे.
श्री जोतिबा मंदिर संवर्धन व दुरुस्ती करणे ............................ 55 कोटी
यमाई मंदिर संवर्धन व दुरुस्ती करणे ................................... 25 कोटी
डोंगरावर येणार्या पायवाटा संवर्धन व सुशोभीकरण करणे ........ 17 कोटी
डोंगरकड्याचे संवर्धन करणे .............................................. 10 कोटी
देवस्थान समिती, प्राधिकरण नवीन कार्यालय बांधणे ................ 5 कोटी
डोंगरावर दोन ठिकाणी ज्योतस्तंभाची निर्मिती करणे ............... 20 कोटी डोंगरावर नवे तळे परिसर विकास करणे ............................... 25 कोटी
केदार विजय गार्डननिर्मिती करणे ........................................ 20 कोटी
यमाई परिसर विकास (चाफेचन) करणे ............................... 10 कोटी
डोंगरावर कर्पूर तलाव संवर्धन करणे .................................... 25 कोटी
चव्हाण तलाव संवर्धन करणे ............................................... 20 कोटी
मुरलीधर पुष्करणी तलाव संवर्धन ....................................... 10 कोटी
ऐतिहासिक अंगारकर वाडा व बाव संवर्धन ............................... 3 कोटी
पार्किंग व्यवस्था ........................................................... 7.50 कोटी
पाणपोई व शौचालय सुविधा करणे ........................................ 2 कोटी
प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शुल्क .............................. 5.09 कोटी
एकूण......................................................................259.59 कोटी