Jyotiba Chaitra Yatra : जोतिबा चैत्र यात्रेसाठी लाखो भाविक दाखल

आज मुख्य दिवस; सायंकाळी पालखी सोहळा
Jyotiba Chaitra Yatra
जोतिबा चैत्र यात्रेसाठी लाखो भाविक दाखल
Published on
Updated on

जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गोवा यासह अनेक राज्यांतून लाखो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. यात्रेचा मुख्य दिवस बुधवार असून, शुक्रवार सकाळपासूनच मानाच्या सासनकाठ्या येण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्या मानाच्या निनाम पाडळी, विहे आणि कान्होरखेड गावांच्या सासनकाठ्यांचे पूजन देवस्थान समितीचे सहायक सचिव महादेव दिंडे, व्यवस्थापक धैर्यशील तिवले, सिंधिया देवस्थान समितीचे व्यवस्थापक अजित झुगर आणि जोतिबा पुजारी यांच्या हस्ते पार पडले.

बुधवारी सायंकाळी हस्त नक्षत्रावर सव्वापाच वाजता ‌‘श्रीं‌’चा मुख्य पालखी सोहळा होणार आहे. तत्पूर्वी, दुपारी 12 पासून सासनकाठ्यांची मिरवणूक निघणार आहे. प्रशासनाकडून यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उत्तर दरवाजातील सासनकाठी मिरवणुकीसाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे. मिरवणूक मार्ग आणि पालखी सोहळा मार्गावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. योगेशकुमार गुप्ता, तहसीलदार माधवी शिंदे आणि कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक कैलास कोडग यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली.

शासकीय अभिषेक

शासकीय पूजाविधीवेळी गर्भगृहात केवळ पाच व्यक्तींनाच (अधिकारी आणि पुजारी) प्रवेश असेल. इतर कोणीही गर्भगृहात प्रवेशासाठी आग्रह धरू नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी केले आहे.

निनाम आणि पाडळी गावांत वाद कायम

निनाम आणि पाडळी गावाच्या एकत्रित असलेल्या प्रथम क्रमांकाच्या सासनकाठीमध्ये याही वर्षी वाद कायम आहे. दोन्ही गावांच्या सासनकाठ्या वेगवेगळ्या आल्या होत्या. मालकी हक्कावरून असलेला वाद सध्या न्यायालयात आहे.

भेसळयुक्त पेढे आणि प्लास्टिकवर कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत सुमारे 26 हजार रुपये किमतीचे भेसळयुक्त पेढे जप्त केले. आरोग्य विभागाने प्लास्टिक पिशव्यांची तपासणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news