कोल्हापूर : पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीनंतर उत्तरार्धात चुरशीने झालेल्या सामन्यात जुना बुधवार पेठने मिळविलेली आघाडी शेवटच्या क्षणी कमी करून बालगोपाल तालीम मंडळाने त्यांना 1-1 असे बरोबरीत रोखले. तत्पूर्वीच्या सामन्यात सुभाषनगरकडून उत्तरार्धात झालेल्या स्वयंगोलमुळे उत्तरेश्वर तालीम मंडळाने सामना एकमेव गोलने जिंकला. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित केएसए शाहू छत्रपती फुटबॉल लीग छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे.
बालगोपालकडून शेवटच्या क्षणी गोल
शनिवारी सायंकाळचा सामना जुना बुधवार पेठ तालीम विरुद्ध बालगोपाल तालीम यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळ झाला. जुना बुधवारकडून थुलूंगा ब्रह्मा, सचिन मोरे, प्रसाद सरनाईक, प्रथमेश जाधव, शुभम जाधव यांनी आघाडीसाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. त्यांच्या रविराज भोसलेच्या दोन सोप्या संध्या वाया गेल्या. बालगोपालकडून विश्वविजय घोरपडे, अभिनव साळोखे, देवराज मंडलिक, प्रथमेश तांदळे, रुद्रेश धुमाळ, सुजित आर यांच्या चढाया अपयशी ठरल्या. यामुळे सामना मध्यंतरापर्यंत गोलशून्य असा तुल्यबळ ठरला. उत्तरार्धात जुना बुधवारच्या रविराज भोसलेच्या दोन सोप्या संधी हुकल्या. 62 व्या मिनिटाला बालगोपालच्या गोलक्षेत्रात उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत थुलूंगा ब्रह्माने गोलची नोंद करत जुना बुधवारला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम होती. यामुळे सामना जुना बुधवारने एकमेव गोलने जिंकणार असे वाटत असताना सामन्याच्या जादा वेळेत (80+) बालगोपालच्या प्रणव गायकवाडच्या कॉर्नरवर विश्वविजय घोरपडेने हेडद्वारे उत्कृष्ट गोल नोंदवत सामना 1-1 असा बरोबरीत केला. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. सामन्यात नियमबाह्य खेळाचे प्रदर्शन केल्याबद्दल जुना बुधवारचा खेळाडू शुभम जाधव याच्यावर मुख्य पंचांनी दोनवेळा यलो कार्डची कारवाई केली. यामुळे रेडकार्डच्या नियमानुसार त्याला सामन्याबाहेर व्हावे लागले.
स्वयंगोलमुळे उत्तरेश्वरचा विजय
दुपारच्या सत्रातील सामना उत्तरेश्वर तालीम मंडळ विरुद्ध सुभाषनगर स्पोर्टस् यांच्यात झाला. मध्यंतरापर्यंत सामना तुल्यबळ ठरला. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून आघाडीसाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. सुभाषनगरकडून इम—ाण पठाण, मुबारक नदाफ, रोहन चव्हाण, जावेद जमादार यांनी गोलसाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. उत्तरेश्वरकडून प्रतीक कांबळे, प्रथमेश जाधव, इलेन्स शर्मा यांनी गोलसाठी लागोपाठ चढाया सुरू ठेवल्या. 65 व्या मिनिटाला झालेल्या चढाई रोखण्याच्या प्रयत्नात सुभाषनगरच्या रोहन गाडेकर याच्याकडून स्वयंगोल झाल्याने उत्तरेश्वरला 1-0 अशी आघाडी मिळाली. या गोलची परतफेड सुभाषनगरकडून अखेरपर्यंयत न झाल्याने सामना उत्तरेश्वरने एकमेव गोलने जिंकत 3 गुणांची कमाई केली.
दोन दिवस सामन्यांना सुट्टी
दरम्यान, रविवार (दि.14) व सोमवार (दि.15) असे दोन दिवस सामन्यांना सुट्टी असणार आहे. पुढचा सामना मंगळवारी (दि.16) दुपारी 4 वाजता, शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात होणार आहे.