Kolhapur Lok Sabha 2024 | हातकणंगले मतदारसंघ : तिकिट जाहीर झाल्यानंतर सत्यजित पाटील सरूडकर समर्थकांचा जल्लोष!

Kolhapur Lok Sabha 2024 | हातकणंगले मतदारसंघ : तिकिट जाहीर झाल्यानंतर सत्यजित पाटील सरूडकर समर्थकांचा जल्लोष!
Published on
Updated on

सरूड; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवारी शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांना जाहीर झाल्याचे समजताच सरुड, बांबवडे, मलकापूर, कोळगांव, विरळे, चरण, थेरगांव अशा ठिकठिकाणी समर्थक कार्यकर्ते, शिवसैनिकांनी एकच जल्लोष सुरू केला. Kolhapur Lok Sabha 2024

दरम्यान, हातकणंगले (आधीचा इचलकरंजी) मतदारसंघाच्या आजवरच्या इतिहासात पश्चिम भागातून एखाद्या पक्षाची उमेदवारी मिळविणारे सत्यजित पाटील हे पहिले वहिले उमेदवार ठरले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने ही ऐतिहासिक किमया साधत इथल्या मतदारांना मोठा संदेश दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने दुसरी उमदेवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले मधून 'आमचे सत्यजित आबा पाटील' यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याची घोषणा केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निष्ठवंत उमेदवाराला मैदानात उतरवल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट आहे. यानंतर कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरला नसल्याचे जल्लोषातून दिसून आले. सत्यजित पाटील यांच्या सरुड या मूळगावी समर्थक कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढून चौकाचौकात फटाक्यांची आतिषबाजी करीत तसेच साखर-पेढे वाटून उमेदवारी मिळाल्याचा आनंद साजरा केला. तर बांबवडे येथे विद्यमान सरपंच ग्रुप तसेच शिवसैनिकांनी सुमारे फटाक्यांची सुमारे तासभर आतिषबाजी केली.

शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंडखोरी केल्यानंतर शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी काहीही झाले तरी ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेत दाखविलेली निष्ठा आणि प्रेम त्यांच्या कामी आल्याचे बोलले जात आहे. गत लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने यांना शिवसेनेत आणून त्यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांच्या प्रचारात एक प्रकारे झंझावात निर्माण करणे किंबहुना माने यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकणाऱ्या घटकांमध्ये सत्यजित पाटील यांचा मोठा वाटा होता. हे सरुडकर यांचे कसब आणि गुण उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी हेरले होते. शिवाय यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने केलेल्या अंतर्गत चाचपणीत सत्यजित पाटील हे उमेदवार म्हणून कसे 'डार्क हॉर्स' ठरू शकतात याचा अंदाज घेतला असल्याचे दिसून येते.

कुशल संघटन कौशल्य, तळागाळातील लोकांशी जुळलेली नाळ, दांडगा लोकसंपर्क, मतदारसंघातील छोट्या छोट्या प्रश्नांची असलेली जाण, त्यासाठी आवश्यक तयारी, अभ्यासू वृत्ती याशिवाय वरिष्ठांप्रतिचा आदरभाव या सत्यजित पाटील यांच्या जमेच्या बाजू त्यांना लोकसभेच्या उमेदवारीपर्यंत घेऊन जाण्यासाठी महत्वाच्या ठरल्या आहेत.

पक्षाने उमेदवारीची संधी देऊन दाखविलेला विश्वास आणि शिवसैनिक, कार्यकर्त्यांचे मिळणारे प्रेम यामुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मोठे बळ आणि उमेद मिळाली आहे. साहजिकच त्यापाटीत माझी जबाबदारीही वाढली आहे. 'मआवि'च्या सर्व नेत्यांच्या सहकार्याने लोकसभा निवडणूक जिंकण्याची खात्री आहे.'
सत्यजित पाटील-सरूडकर, शिवसेना ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news