

कोल्हापूर : राज्यातीलच नव्हे तर कर्नाटक, आंध— प्रदेश आदी परराज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर आणि परिसराचा तिरुपतीच्या धर्तीवर विकास होणार आहे. पहिल्या टप्प्यात मंदिर परिसरातील विकासकामे केली जाणार आहेत.
जोतिबा मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाने 1 हजार 804 कोटींचा आराखडा राज्य शासनाला सादर केला आहे. हा आराखडा चार टप्प्यांत राबविण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार पहिला टप्प्यासाठी 259 कोटी 59 लाख रुपयांना मंजुरी दिली आहे. यासह विविध विभागांकडून त्यांच्याकडे असणार्या योजनांतून 227 कोटी 46 लाख रुपयांची कामे केली जाणार आहेत. जोतिबा परिसर विकासाच्या आराखड्याचे पहिल्या टप्प्यातील काम दोन वर्षांत पूर्ण करायचे आहे. त्यानुसार या टप्प्यातील कामे निश्चित करण्यात आली आहेत.
* जोतिबा, यमाई मंदिराचे संवर्धन, चाफेवन परिसर विकास
या आराखड्याद्वारे जोतिबा, यमाई मंदिराचे संवर्धन होणार आहे. यासह यमाई मंदिर व चाफेवन परिसरासाचा विकास केला जाणार आहे. केदार विजय गार्डनचेही सुशोभीकरण केले जाणार आहे.
* पायवाटांचे जतन, तलावांचे होणार संवर्धन
मंदिराच्या विविध पायवाटांचे जतन केले जाणार आहे. त्या सुशोभित आणि मजबूत केल्या जाणार आहेत. डोंगरावरील कर्पूरेश्वर, चव्हाण व मुरलीधर तलावांचे संवर्धन केले जाणार आहे. नवतळे परिसराचे सुशोभीकरण होणार.
* वाहनतळ, सुविधा केंद्र आणि ज्योतस्तंभ उभारणार
भाविकांसाठी प्रशस्त वाहनतळ उभारले जाणार आहेत. यासह भाविक, पर्यटकांना सर्व सुविधा एकाच छताखाली देणारे सुविधा केंद्रही होणार. अपारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे ज्योतस्तंभ निर्मिती केली जाणार.
* घनकचरा व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
पहिल्या टप्प्यातील आराखड्यात जोतिबा डोंगर परिसरात घनकचरा व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही उभारला जाणार आहे.